मयूर पठाडे / ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 18 - आयपीएलच्या वाहत्या गंगेत अनेकांनी हात धुवून घेतले. त्यात जगभरातल्या अनेकांना बरंच काही मिळालं. पैसा, प्रतिष्ठा आणि प्रसिद्धी तर इतकी मिळाली की अनेकांच्या आयुष्याचंच सोनं झालं. जगातला सर्वाधिक चपळ क्षेत्ररक्षक म्हणून कीर्ती मिळालेला दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू आणि आयपीएलच्या मुंबई इंडियन्स संघाचा फिल्डिंग कोच जॉन्टी र्होड्स याला मात्र आपीएलनं अशी काही भेट दिली, जी सोन्यामानकांच्या पोतडीपेक्षाही मोठी ठरली. 2015च्या आयपीएलदरम्यान जॉन्टी र्होड्सला भारतात मुलगी झाली. तिचं नाव ‘इंडिया’. ही चिमुरडी ‘इंडिया’ही आता भारताची आणि त्यातही विराट कोहलीची जबरा फॅन आहे.
खुद्द जॉन्टी र्होड्सनंच आपली कन्या ‘इंडिया’चा विराटच्या पोस्टरसोबतचा फोटो नुकताच ट्विटरवर पोस्ट केला. या फोटोच्या सोबत त्यानं टाकलेली कॅप्शनही तशीच मजेदार आहे. ‘असं वाटतंय की विराट कोहलीला आणखी एक नवीन फॅन मिळाला आहे. पण त्यासाठी आपण ‘इंडिया’ला जबाबदार नाही धरू शकत.’
विराटनं काय केलं ट्विट?
विराटनंही तितकंच मजेदार ट्विट करताना म्हटलं, ‘क्यूटनेस ओवरलोड!’
जॉन्टी र्होड्सनं मुलीचं नाव का ठेवलं ‘इंडिया’?
आयपीएल 2015च्या सिझनमध्ये जॉन्टी र्होड्सला भारतात असतानाच मुलगी झाली. जॉन्टी र्होड्स आयपीएलचा तर फॅन आहेच, पण भारताचीही त्याला जबरदस्त क्रेझ आहे. भारतानं आपल्याला खूप काही दिलं असं तो आजही मानतो. मुलीचं नाव ‘इंडिया’ असं का ठेवलं असं विचारल्यावर तो सांगतो, ‘भारतीय संस्कृती आणि सभ्यातेनं मी इतका प्रभावित झालो आहे की, माझ्या मुलीसाठी ‘इंडिया’पेक्षा अधिक चांगलं दुसरं कुठलं नाव असूच शकत नाही. त्यामुळेच मी माझ्या लाडक्या लेकीचं नाव ठेवलं ‘इंडिया’!
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘इंडिया’ला हटके शुभेच्छा
अलीकडेच 23 एप्रिल रोजी ‘इंडिया’चा वाढदिवस झाला. त्यावेळीही जॉन्टी र्होड्सनं ‘इंडिया’चा फोटो ट्विटरवर पोस्ट केला होता आणि लिहिलं होतं, ‘हॅपी बर्थडे इंडिया.’ त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही आपल्या ट्विटर हॅँडलवरुन जॉन्टी र्होड्सला टॅग करून ‘इंडिया’ला शुभेच्छा देताना लिहिलं होतं, ‘हॅपी बर्थडे टू इंडिया फ्रॉम इंडिया.
आयपीएलची ही अशी अनोखी देण.
आयपीएलमुळे काही जण, एकाच खेळीत एका रात्रीत स्टार झाले. त्यांचे स्टार जसे अचानक चमकले, तसे काही जणांचे स्टार दुसर्याच दिवशी विझलेही, पण तरीही त्या एका दिवसानं, त्या दिवसाच्या खेळीनं त्यांना जे मिळालं, त्यातून त्यांच्या काही पिढय़ा बसून खाऊ शकतील इतकी बक्कळ कमाई त्यांनी केली. आयपीएल जगभरात इतकं प्रिय आहे ते त्यामुळेच. अनेक परदेशी खेळाडू तर आपल्या देशाकडून खेळण्यापेक्षाही पहिलं प्राधान्य आयपीएलला देतात ते यामुळेच. आयपीएलच्या निव्वळ एका सिझनमधूनही त्यांच्या आयुष्यभराचं उखळ पांढर होतं. जॉन्टी र्होड्सची गोष्ट मात्र खरंच वेगळी. आयपीएलनं त्यालाही खूप पैसा मिळवून दिला, पण आयपीएलनं त्याला दिलेली मुलगी ‘इंडिया’ ही त्याची आयुष्यभराची दौलत आहे.
जॉन्टी र्होड्सनं आपल्या क्रिकेट कारकिर्दीत इतके अशक्यप्राय आणि अक्षरश: चमत्कार वाटावेत असे झेल घेतले की अक्षरश: आश्चर्यानं तोंडात बोटं घालावीत.
बघा जॉन्टी र्होड्सच्या अफलातून कॅचेसचा हा व्हीडीओ..