नवी दिल्ली : कर्नाटक, महाराष्ट्र आणि हरियाणा या महत्त्वपूर्ण राज्यांमध्ये राज्यपालपदी कुणाची वर्णी लागेल, यावरून चर्चा सुरू झाली असतानाच मुरली मनोहर जोशी, कल्याणसिंह आणि व्ही़ के़मल्होत्रा यांच्यासारख्या भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांना राज्यपालपदाची ‘बक्षिसी’ दिली जाऊ शकते़अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यपालपदांच्या संभाव्य यादीत या नेत्यांशिवाय भाजपातून बडतर्फ केले गेलेले जसवंतसिंह, लखनौचे माजी खासदार लालजी टंडन, मध्यप्रदेशातील पक्षाचे ज्येष्ठ नेते कैलाश जोशी आणि उत्तर प्रदेशचे माजी विधानसभाध्यक्ष केसरीनाथ त्रिपाठी यांच्या नावांचीही चर्चा आहे़कानपूर येथून लोकसभेवर निवडून आलेले मुरली मनोहर जोशी यांना मोदी मंत्रिमंडळात स्थान मिळू शकले नाही, तर कल्याणसिंह यांनी आपला मुलगा राजवीर याच्यासाठी निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला़ मल्होत्रा आताशा राजकारणात फारसे सक्रिय नाहीत़महाराष्ट्र, हरियाणा आणि झारखंड या तीन राज्यांत यावर्षी विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत़ भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (रालोआ) सरकार या राज्यांत नव्या राज्यपालांची नियुक्ती करू शकते़ विद्यमान राज्यपालांपैकी एच़आर. भारद्वाज (कर्नाटक), जगन्नाथ पहाडिया (हरियाणा), देवानंद कुंअर (त्रिपुरा), मार्गारेट अल्वा (राजस्थान) यांचा कार्यकाळ येत्या तीन महिन्यांत पूर्ण होत आहे़येत्या सहा ते आठ महिन्यांत कमला बेनीवाल (गुजरात), एम़ के़ नारायणन (प़ बंगाल), जे़बी़ पटनायक (आसाम), शिवराज पाटील (पंजाब) आणि ऊर्मिला सिंग (हिमाचल प्रदेश) यांचा राज्यपालपदाचा कार्यकाळ संपत आहे़ (लोकमत न्यूज नेटवर्क)
जोशी, कल्याणसिंह, मल्होत्रांना राज्यपालपद?
By admin | Published: June 09, 2014 5:35 AM