जोतिबा : दख्खनचा राजा श्री जोतिबाच्या नवरात्रौत्सवास आज, गुरुवारी मोठ्या धार्मिक वातावरणात प्रारंभ झाला. श्री जोतिबा मंदिरात घटस्थापना, भजन, धुपारती, आदी धार्मिक विधी झाले. श्री क्षेत्र जोतिबा डोंगरावर आज जोतिबाचा नवरात्र उपवास सुरू झाला. नवरात्रौत्सवाचा पहिला दिवस पहाटे ३ वाजता घंटानादाने मंदिराचे दरवाजे उघडले. पहाटे ४ ते ५ वाजता काकड आरती, मूखमार्जन, पाद्यपूजा विधी झाला. पहाटे ५ वाजता श्री जोतिबा मूर्तीस अभिषेक घालण्यात आला. सकाळी ६ वाजता श्री जोतिबाची नागवल्ली पानातील आकर्षक अशी अलंकारिक महापूजा बांधण्यात आली. ही पूजा फक्त नवरात्रौत्सवामध्ये पहिल्या दिवशी बांधण्यात येते. सकाळी ९ वाजता उंट, घोडा, वाजंत्री, देव सेवक, पुजारी यांच्या लवाजम्यांसह धुपारती सोहळा निघाला. यमाई, तुकाई, जोतिबा मंदिरातील सर्व मंदिरातून घटस्थापनेचा विधी झाला. सुवासिनी महिलांनी धुपारतीचे औक्षण करून सुगंधी दुधाचे वाटप केले. धुपारती समवेत देवस्थान समितीचे प्रभारी लक्ष्मण डबाणे, सरपंच रिया सांगळे, उपसरपंच जगन्नाथ दादर्णे, नवरात्र उपासक, देवसेवक, भाविक-पुजारी उपस्थित होते. दुपारी १ वाजता तोफेची सलामी देऊन धुपारतीची सांगता झाली. रात्री भजन व डवरी गीतांचा कार्यक्रम झाला. (वार्ताहर)जोतिबा नवरात्रौत्सव काळात जोतिबा मंदिरातील नित्य धार्मिक विधीमध्ये बदल होतात. नवरात्रौत्सव काळात जोतिबाचे मंदिर रात्री १ ला बंद होते व पहाटे ३ वाजता उघडले जाते. २२ तास मंदिर दर्शनासाठी खुले असते. अभिषेक पहाटे ५ वाजता एकवेळ होतो. नवरात्रौत्सव काळात जोतिबा देवास पलंग घातला जात नाही. दररोज दुपारी १ वाजता व रात्री १२ वाजता त्रिफाळ आरती होते. नऊ दिवस श्री जोतिबांची कमळ पुष्पातील पूजा बांधण्यात येते.जोतिबा मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. दर्शन रांगा व्यवस्थेसाठी उड्डाणपूल बांधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात आहे.नवरात्रौत्सवाच्या पहिल्या दिवशी दख्खनचा राजा श्री जोतिबांची बांधण्यात आलेली नागवल्ली पानातील अलंकारिक बैठी महापूजा.
जोतिबा डोंगर : नवरात्रोैत्सवास उत्साहात प्रारंभ
By admin | Published: September 25, 2014 11:04 PM