नवी दिल्ली - पत्रकारिता क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणारे ज्येष्ठ पत्रकार आणि एनडीटीव्ही या वृत्तवाहिनीचे मॅनेजिंग एडीटर रवीश कुमार यांना रॅमन मॅगसेसे पुरस्काराने गौरविण्यात आलं आहे. हिंदी टीव्ही पत्रकारितेत उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे त्यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. रॅमन मॅगसेसे पुरस्कार हा आशिया खंडातील नोबल पुरस्कार म्हणून गणला जातो. आशियातील अशा व्यक्तींचा हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते ज्यांनी आपल्या क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान दिलं आहे.
हा पुरस्कार फिलीपीन्सचे माजी राष्ट्रपती रॅमन मॅगसेसे यांच्या स्मरणार्थ दिला जातो. पुरस्कार संस्थेने ट्वीट करुन रवीश कुमार यांचा सन्मान दबलेल्या लोकांचा आवाज बनल्यामुळे दिला आहे. रवीश कुमार यांचा एनडीटीव्हीवरील प्राईम टाईम शोमध्ये सामान्य जनतेचे वास्तव आणि अनेक समस्यांना वाचा फोडली जाते. रवीश कुमार हे सहावे पत्रकार आहेत ज्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. रवीश कुमार यांच्याआधी हा पुरस्कार अमिताभ चौधरी(1961), बीजी वर्गीय(1975), अरुण शौरी(1982) आर के लक्ष्मण(1984), पी, साईनाथ(2007) यांना हा पुरस्कार मिळाला आहे.
हलाखीच्या परिस्थितीवर मात करत रवीश कुमार यांनी आज हे यशाचं शिखर पटकावलं आहे. 1996 पासून ते एनडीटीव्हीशी जोडले गेले आहेत. समाजाच्या समस्या, देशामधील परिस्थिती यांची अचूक नस पकडून सामान्य माणसाशी थेट संवाद साधण्याची त्यांची कला प्रसिद्ध आहे. रवीश की रिपोर्ट हा त्यांचा एनडीटीव्हीवरील कार्यक्रम बहुचर्चित आहे.
सत्ताधाऱ्यांच्या विरोधात त्वेषाने आपलं मत मांडण्यासाठी रवीश कुमार ओळखले जातात. आज त्यांना जाहीर झालेल्या रॅमन मॅगसेसे पुरस्कारामुळे त्यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. रवीश कुमार यांचे अनेक स्तरातून कौतुक आणि अभिनंदन होत आहे.