नवी दिल्ली - प्रसिद्ध पत्रकार विनोद वर्मा यांना छत्तीसगड पोलिसांनी अटक केली आहे. गाजियाबादमधील इंदिरापुरम परिसरात असणा-या त्यांच्या घरातून पोलिसांनी विनोद वर्मा यांना अटक केली. रायपूर पोलिसांच्या एका पथकाने ब्लॅकमेलिंग आणि खंडणीच्या आरोपाखाली विनोद वर्मा यांना अटक केली आहे. विनोद वर्मा एक वरिष्ठ पत्रकार असून, त्यांनी बीबीसीसाठी काम केलं आहे. आपल्या छत्तीसगड सरकारमधील मंत्री राजेश मूणत यांची सेक्स सीडी असल्याने अटकेची कारवाई करण्यात आल्याचा आरोप विनोद वर्मा यांनी केला आहे.
पोलिसांनी विनोद वर्मा यांच्या घरातून 500 सीडी, लॅपटॉप आणि पेन ड्राईव्ह सापडलं असल्याचं सांगितलं आहे. या सर्व सीडी वाटण्यात येणार होत्या असा दावा पोलिसांनी केला आहे. मात्र सीडीमध्ये नेमकं काय आहे याबद्दल सांगण्यास त्यांनी नकार दिला.
'माझ्याकडे छत्तीसगडचे मंत्री राजेश मूणत यांची सेक्स सीडी आहे. त्यामुळेच छत्तीसगड सरकार माझ्यावर नाराज आहे', असं विनोद वर्मा यांनी न्यायालयात नेलं जात असताना पत्रकारांना सांगितलं. आपल्याला जाणुनबुजून फसवलं जात असल्याचा आरोप विनोद वर्मा यांनी केला आहे. 'ही सीडी पब्लिक डोमेन असून, आपला याच्याशी काही संबंध नाही', असंही त्यांनी सांगितलं आहे.
राजेश मूणत यांनी मात्र ही सीडी बनावट असल्याचा दावा केला असून, तुम्हाला हवं असेल त्यांना तपास करायला सांगा असं सांगत आव्हान दिलं आहे. पत्रकार परिषदेत राजेश मूणत यांनी सांगितलं की, 'सोशल मीडियाच्या माध्यमातून मला सीडीबद्दल माहिती मिळाली असून, ही पुर्णपणे बनावट आहे. ज्या एजन्सीला तपास करायला सांगायचं आहे त्यांना सांगा. आपण कोणत्याही चौकशीला तयार आहोत'. छत्तीसगड भाजपाने विनोद वर्मा यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत ते पत्रकार आहेत की काँग्रेसचे एजंट असा प्रश्न विचारला आहे.
विनोद वर्मा यांच्याविरोधात छत्तीसगडमधील पोलीस ठाण्यात आयटी अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल दाखल करण्यात आला असून, त्याआधारे पोलिसांनी अटकेची कारवाई केली आहे. त्यांच्यावर एका नेत्याला ब्लॅकमेल केल्याचा आरोप आहे. पोलिसांना सीडीशिवाय विनोद वर्मा यांच्या घरात दोन लाख रोख रुपये सापडले आहेत.
विनोद वर्मा यांना अटक करणा-या रायपूर पोलिसांच्या टीमने पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे की, 'छत्तीसगड भाजपाच्या आयटी सेलमधील प्रकाश बजाज यांनी केलेल्या तक्रारीच्या आधार अटकेची कारवाई करण्यात आली. प्रकाश बजाज यांनी आपल्या तक्रारीत विनोद वर्मा नाव सांगणा-या एका व्यक्तीने फोनवरुन धमकी दिला असून, सेक्स सीडीवरुन ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. तुमच्या बॉसची सीडी आपल्याकडे असल्याचं समोरची व्यक्ती सांगत होती. जर मागण्या पुर्ण झाल्या नाही तर सीडी वाटण्यात येतील अशी धमकीही त्याने दिली होती'.
एका सीडी शॉपमधून आपल्या हाती पुरावा लागल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. याच सीडी शॉपमध्ये विनोद वर्मा यांनी सीडीच्या 1000 कॉपी बनवण्याची ऑर्डर दिली होती अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'दुकानदाराने आपल्याला विनोद वर्मा यांचा फोन क्रमांक दिला आणि त्यांनीच या 1000 सीडी बनवण्याची ऑर्डर दिली'.
काँग्रेसने विनोद वर्मा यांच्या अटकेचा निषेध केला आहे. विनोद शर्मा यांच्या अटकेमागे सेक्स स्कॅण्डल असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. भाजपाने मात्र आरोप फेटाळले आहेत.