मुंबई: आज म्हणजे 30 नोव्हेंबर रोजी एक रूपयाच्या नोटेला 100 वर्ष पूर्ण झाले आहेत. आजकाल एक रूपयाची नोट शोधूनही सापडत नाही, कोणाला मिळालीच तर पुढच्या पिढीला सांगता यावी, दाखवता यावी म्हणून अनेकजण ही नोट सांभाळून ठेवतात. 30 नोव्हेंबर 1917 रोजी पहिल्यांदा देशात एक रूपयाची नोट जारी करण्यात आली होती. 100 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने जाणून घेऊया एक रूपयाच्या नोटेविषयी...
- पहिली एक रूपयाची नोट प्रथम विश्वयुद्धाच्या दरम्यान चलनात आली होती. 30 नोव्हेंबर 1917 रोजी इंग्रज सरकारने ही नोट जारी केली होती.
- पहिल्यांदा जारी झालेल्या नोटेवर ब्रिटनचे तत्कालिन राजा किंग जॉर्ज V यांचा फोटो होता.
- त्यानंतर ब्रिटनचे पुढील राजा किंग जॉर्ज VI यांच्या फोटोसह ही नोट जारी करण्यात आली होती.
- चलनात आल्याच्या काही वर्षांमध्येच म्हणजे 1926 मध्ये ब्रिटिश सरकारने ही नोट बंद केली होती. छपाईसाठी जास्त खर्च येत असल्यामुळे ही नोट बंद करण्यात आली होती.
- त्यानंतर एक रूपयाच्या नोटेला 1940 मध्ये पुन्हा जारी करण्यात आलं. 1970 पर्यंत ही नोट बहरीन, मस्कत या देशांमध्येही वापरता येत होती.
- एका रूपयाची एकमेव अशी नोट आहे, ज्यावर 'गव्हर्नमेंट ऑफ इंडिया' असं लिहिलेलं असतं, पण इतर नोटांवर 'रिझर्व बॅंक ऑफ इंडिया' असं लिहिलेलं असतं.
- केवळ एक रूपयाच्याच नोटेवर वित्त सचिवांची स्वाक्षरी असते, पण इतर नोटांवर आरबीआयच्या गव्हर्नरची स्वाक्षरी असते.