ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 7 - भारतीय रेल्वे दिवसेंदिवस कात टाकत असून नव्या घोषणा करत आहे. रेल्वेनं आणखी एक घोषणा केली असून, ती प्रवाशांच्या खिशाला चाट लावणार आहे. रेल्वे प्रशासनानं 9 सप्टेंबरपासून राजधानी, शताब्दी आणि दुरांतो एक्स्प्रेसमध्ये फ्लेक्सी फेअर स्किम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या ट्रेनच्या तिकिटांच्या किमतीत 10 टक्क्यांनी वाढ होणार आहे.
जे प्रवासी पहिले तिकीट बुक करतील त्यांना वाढीव ही किंमत द्यावी लागणार नाही. मात्र शेवटच्या वेळी तिकीट बुक करणा-या प्रवाशांना हा भुर्दंड सोसावा लागणार आहे. फ्लेक्सी फेअर सिस्टीमनुसार 10 टक्के सीट सोडून उर्वरित सीटसाठी प्रवाशांकडून दीडपट भाडे आकारले जाणार आहे. राजधानी आणि दुरांतो रेल्वेमध्ये यासाठी 10 टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. परंतु 10 टक्के तिकिटांच्या बुकिंग पुढे जाताच 10 टक्के दरवाढ द्यावी लागणार आहे. 50 टक्के तिकिटांची बुकिंग झाल्यानंतर 50 टक्के तिकिटांसाठी 10 टक्के म्हणजेच दीडपट भाडं द्यावं लागणार आहे.
भारतीय रेल्वेला कर्जातून मुक्त करण्यासाठी रेल्वे प्रशासनानं हे पाऊल उचलल्याची चर्चा आहे. शताब्दी रेल्वेच्या चेअरकारच्या तिकिटांसाठी ही किंमत लागू होणार असून, दुरांतो एक्स्प्रेसमधल्या स्लीपर आणि सेकंड क्लासमधल्या प्रवाशांनाही याचा फटका बसणार आहे.