नवी दिल्ली - एअर इंडियाच्याविमानातून एका कोरोना पॉझिटीव्ह व्यक्तीने प्रवास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. राजधानी दिल्ली ते लुधियाना असा विमानप्रवास करण्यात आला होता. मात्र, या विमानातील एक प्रवासी कोरोना पॉझिटीव्ह आढळून आला आहे. त्यामुळए, याच विमानातून प्रवास करणाऱ्या इतर प्रवाशांना १४ दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात आले आहे.
लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात केंद्र सरकारने देशांतर्गत विमानसेवेला परवानगी दिली आहे. काही अटी व शर्तींसह सरकारने प्रवाशांना ही सवलत दिली आहे. तर, विदेशात अडकलेल्या भारतीयांनाही मायदेशी आणण्यात येत आहे. वंदे भारत मिशनअंतर्गत या सर्वांची घरवापसी होत आहे. देशात लॉकडाऊन कालावधीत अडकून पडलेले सर्वच प्रवासी आता आपल्या स्वगृही परतत आहेत. दिल्ली ते लुधियाना अशा विमानप्रवासात एक व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह आढळून आली. अलायंस एअरच्या सिक्युरिट विभागात ही व्यक्ती कार्यरत असून तिकाटाचे पैसे भरून या व्यक्तीने विमान प्रवास केल्याचे एअर इंडियाने सांगितले.
यापूर्वी इंडिगोच्या विमानातील एक प्रवासी कोरोना पॉझिटीव्ह आढळून आला होता. चेन्नई ते कोईम्बतुर प्रवास करताना, ही व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह आढळून आली होती. देशांतर्गत विमानसेवा सुरु झाल्यानंतर विमानप्रवासातील कोरोना प्रवाशाची ही पहिलीच केस होती. त्यानंतर, आता एअर इंडियाच्या विमानात आणखी एक प्रवासी पॉझिटीव्ह आढळून आला आहे.