- संजय शर्मानवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाचा नवा राष्ट्रीय अध्यक्ष नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) मुख्यालयात ठरणार आहे. भाजप नेत्यांनी नव्या अध्यक्षांच्या निवडीची जबाबदारी आरएसएसवर सोडली आहे.
विद्यमान अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. तसेच त्यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्याने नव्या अध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया लवकरच सुरू होईल. या पदासाठी मनोहरलाल खट्टर, शिवराजसिंह चौहान, भूपेंद्र यादव, धर्मेंद्र प्रधान, सी. आर. पाटील ही नावे चर्चेत होती. मात्र, या सर्वांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्याने ही नावे मागे पडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांनी भाजपचा नवा राष्ट्रीय अध्यक्ष निवडण्याची जबाबदारी आरएसएसवर सोडली आहे. त्यामुळे भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष हे आरएसएसच्या मुशीतून तयार झालेले अर्थात संघनिष्ठ नेते असतील, असे मानले जात आहे.
ऐनवेळी नवे नाव येईल पुढेभाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील बन्सल, विनोद तावडे आणि माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या नावांचीही चर्चा आहे. मात्र, ऐनवेळी अशा नेत्याचे नाव समोर येईल ज्याची प्रसार माध्यमे कल्पनाही करू शकत नाहीत, असे आरएसएसच्या एका नेत्याने सांगितले. २००९ मध्ये सर्व अंदाज चुकवत नितीन गडकरींची अध्यक्षपदी निवड झाली होती.
ओम माथूर, सुनील बन्सल हेही स्पर्धेत लखनाै : जे.पी. नड्डा यांचा मोदींच्या मंत्रिमंडळात समावेश झाल्यामुळे लवकरच पक्षाचा नवा अध्यक्ष निवडला जाणार आहे. पक्षातील अनेक ज्येष्ठ नेत्यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यामुळे या पदावर नव्या चेहऱ्याची निवड केली जाण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ओम माथूर, सुनील बन्सल यांची नावे चर्चेत आहे. याशिवाय विनोद तावडे यांचेही नाव चर्चेत आहे.
आरएसएसवर का सोपविली जबाबदारी? अध्यक्षपदासाठी सी. आर. पाटील यांचे नाव सर्वांत योग्य मानले जात होते. मात्र, पंतप्रधान व गृहमंत्री दोघेही गुजरातचे असताना पक्षाध्यक्षपदही गुजरातला देणे योग्य नव्हते. त्यामुळे पाटील यांना मंत्री केले. शिवराजसिंह चौहान यांना राष्ट्रीय अध्यक्ष व्हायचे होते.मोदी व शाह यांना ते अध्यक्षपदी नको होते. मनोहर लाल खट्टर यांना मोदींची पसंती होती. मात्र, आरएसएसला हे नाव मान्य नव्हते. त्यामुळे अध्यक्षपदाची जबाबदारी आरएसएसवर सोपविली.