नवी दिल्ली - पूर्ववेळ भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी विराजमान झालेल्या जेपी नड्डा यांच्या नेतृत्वात दिल्लीतील विधानसभा निवडणूक पार पडली. नड्डा यांच्यासाठी अध्यक्षपदावर आल्यानंतर ही पहिलीच निवडणूक होती. त्यातही भाजपला दारुण पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर नड्डा सक्रिय झाले असून त्यांनी दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांच्याकडे स्पष्टीकरण मागितले आहे.
दिल्लीत भाजपचे महासचिव आणि संघटनमंत्री बी.एल. संतोष यांच्या उपस्थितीत दोन तास चाललेल्या बैठकीत भाजपच्या पराभवाची समिक्षा करण्यात आली. त्यानंतर भाजपच्या शुक्रवारी होणाऱ्या मंथन बैठकीनंतर दिल्लीतील पराभवाची कारणे पक्षाध्यक्ष नड्डा यांच्याकडे सोपविण्याच्या सूचना मनोज तिवारी यांना देण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले.
निवडणुकीत भाजपला दारुण पराभव पत्करावा लागला आहे. या निवडणुकीत भाजपच्या मतांच्या टक्केवारीत 2015 च्या तुलनेत वाढ झाली आहे. मात्र 70 पैकी आठच जागांवर विजय मिळाल्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे या पराभवाची भाजपकडून कारणमिमांसा करण्यात येत आहे. या मंथनानंतर भाजपमध्ये संघटनात्मक बदल करण्यात येणार आहे.