नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील कूचबिहारमध्ये एका महिलेला विवस्त्र करून भररस्त्यात मारहाण करण्यात आली. महिलेला मारहाण केल्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. तसेच, भाजपने या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. पश्चिम बंगाल महिलांसाठी सुरक्षित नाही, असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी म्हटले आहे. त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
यासंदर्भात जेपी नड्डा यांनी ट्विट केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, "पश्चिम बंगालमधून एक भयावह व्हिडिओ समोर आला आहे, जो केवळ धर्मशास्त्रांमध्ये अस्तित्वात असलेल्या क्रूरतेची आठवण करून देतो. प्रकरण आणखी वाईट करण्यासाठी, टीएमसी केडर आणि आमदार या कृत्याचे समर्थन करत आहेत. संदेशखळी असो, उत्तर दिनाजपूर असो वा अन्य कुठलेही ठिकाण… दीदींचे पश्चिम बंगाल महिलांसाठी असुरक्षित आहे."
दरम्यान, गेल्या चार दिवसांपूर्वी कूचबिहार जिल्ह्यातील पक्षाच्या अल्पसंख्याक सेलच्या महिला अधिकारी रोसोनारा खातून यांना घरातून बाहेर ओढून रस्त्यावर आणले आणि विवस्त्र करून मारहाण करण्यात आली. या घटनेनंतर पुन्हा रविवारी (३० जून) उत्तर दिनाजपूर जिल्ह्यातील चोप्रा येथील एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यामध्ये एक पुरुष हा एक महिला आणि एक पुरुष या दोघांना रस्त्यावर काठीने मारहाण करताना दिसत आहे. यावरून विरोधक राज्यातील ममता सरकारवर हल्लाबोल करत आहेत.