मीडियापासून दूर राहा; ब्रिजभूषण यांना भाजप अध्यक्षांचा आदेश, विनेश फोगाटवर केलेली टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2024 14:59 IST2024-09-08T14:58:30+5:302024-09-08T14:59:49+5:30
हरियाणा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाने हे आदेश दिले आहेत.

मीडियापासून दूर राहा; ब्रिजभूषण यांना भाजप अध्यक्षांचा आदेश, विनेश फोगाटवर केलेली टीका
Brijbhushan Sharan Singh : हरियाणात विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत, त्यामुळे सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. अलीकडेच कुस्तीपटू विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, त्यानंतर राष्ट्रीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भाजप नेते ब्रिजभूषण शरण सिंह (Brijbhushan Sharan Singh) यांची अनेक विधाने समोर आली. आजही त्यांनी या मुद्द्यावरुन काँग्रेसवर टीका केली आहे. मात्र, आता त्यांना मीडियाशी न बोलण्याचे आदेश पक्षाकडून देण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी ब्रिजभूषण शरण सिंह यांना मीडियापासून दूर राहण्याचा आदेश दिला आहेत. विनेश आणि बजरंगविरोधातील त्यांच्या वक्तव्यांचा परिणाम हरियाणा निवडणुकीवर पडू शकतो, असेही पक्षाकडून त्यांना सांगण्यात आले आहे.
काय म्हणाले ब्रिजभूषण?
ब्रिजभूषण सिंह यांनी आज हरियाणा काँग्रेसवर हल्लाबोल केला. महाभारताच्या काळात पांडवांनी द्रौपदीला पणाला लावले होते, यासाठी आजपर्यंत देशाने पांडवांना माफ केलेले नाही. असा जुगार हुड्डा परिवाराने देशातील महिलांची इज्जत पणाला लावून खेळला आहे. त्यांनाही कधी माफ करणार नाही. तीन घटनांबाबत माझ्यावरही आरोप लावण्यात आले होते, पण आरोप निराधार निघाले.
एवढे मोठे नाटक कशाला केले?
ब्रिजभूषण पुढे म्हणतात, माझ्याविरोधात आंदोलन केले आणि आता काँग्रेसमध्ये सामील झाले. मग एवढे मोठे नाटक का रचले? तुम्ही कोणत्या महिलांसाठी लढ आहात? तुम्ही फक्त एका कुटुंबासाठी लढत आहात. मी जर छेडछाढ केली असती, तर तेव्हाच मला मारले नाही, तेव्हाच का गोंधळ घातला नाही. माझे नुकसान झाले, कुस्तीचे नुकसान झाले. किमान आपण पाच पदके जिंकू शकलो असतो, पण या लोकांनी सर्व काही उद्ध्वस्त केले. क्रीडा राजकारण, हे हरियाणातील मोठे राजकारण आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.
विनेश फोगाटला काँग्रेसकडून उमेदवारी
हरियाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने विनेश फोगट यांची उमेदवारी जाहीर केली आहे. हरियाणातील जुलाना येथून काँग्रेसने विनेश फोगट यांना उमेदवारी दिली असून बजरंग पुनिया यांना अखिल भारतीय किसान काँग्रेसचे कार्याध्यक्ष बनवले आहे.