वन नेशन, वन इलेक्शनबाबत चर्चा करून निर्णय घेण्यासाठी नियु्क्त करण्यात आलेल्या संयुक्त संसदीय समितीच्या सदस्यांच्या नावांची घोषणा झाली आहे. यामध्ये अनुराग ठाकूर, प्रियंका गांधी यांच्यासह लोकसभेतील २१ आणि राज्यसभेमधील १० अशा एकूण ३१ सदस्यांचा समावेश आहे. ही समिती लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांसाठी एकाच वेळी निवडणूक घेण्याच्या निर्णयामधील व्यवहार्यता तपासून पाहणार आहे.
जेपीसी अर्थात संयुक्त संसदीय समितीमध्ये भाजपाचे अनुराग ठाकूर, काँग्रेसच्या प्रियंका गांधी या प्रमुख नेत्यांसह समाजवादी पार्टीचे धर्मेंद्र यादव, तृणमूल काँग्रेसचे कल्याण बॅनर्जी, एनसीपीएसपीच्या सुप्रिया सुळे, शिवसेनेचे श्रीकांत शिंदे, भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा, केंद्रीय मंत्री अनिल बलुनी, बांसूरी स्वराज, मनिष तिवारी, भर्तृहरी महताब यांचा समावेश आहे.
वन नेशन वन इलेक्शनच्या माध्यमातून देशात एकाच वेळी निवडणुका घेतल्याने शासन व्यवस्था ही सुरळीतपणे सुरू राहील. तसेच निवडणुकांसाठीचा खर्च कमी होईल, असा दावा सत्ताधारी पक्षाकडून करण्यात येत आहे. तर विरोधी पक्षांकडून या निर्णयाच्या संघीय व्यवस्थेवर होणाऱ्या परिणामांबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे. आता जेपीसीच्या माध्यमातून याबाबत साधक बाधक चर्चा करून या निवडणूक सुधारणांबाबत एकमत करण्याबाबत प्रयत्न केले जाणार आहेत. ही संयुक्त संसदीय समिती संसदेच्या पुढच्या अधिवेशनामध्ये आपला अहवाल, सादर करेल, असी अपेक्षा आहे.