मुंबई: जेएसडब्ल्यू समूहाचे अध्यक्ष व प्रसिद्ध उद्योगपती सज्जन जिंदल यांनी मंगळवारी ट्विटरच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अप्रत्यक्ष पाठिंबा दर्शवला. एकापाठोपाठ एक असे दोन ट्विट करत जिंदल यांनी मोदींच्या कामाचं कौतुक केलं. मोदी सरकारनं अर्थव्यवस्थेच्या भरभराटीसाठी काम केलं असल्यानं त्यांना दुसरी टर्म मिळायला हवी, असं जिंदल यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
'एक्झिट पोलची आकडेवारी पाहता सध्याचे भारताचे नेतृत्त्व पुन्हा सत्तेवर येईल, असं दिसत आहे. सध्याच्या सरकारनं त्यांच्या कार्यकाळात अर्थव्यवस्थेला चालना दिली. त्यामुळे या सरकारला आणखी पाच वर्षे संधी मिळालीच पाहिजे,' असं जिंदल यांनी त्यांच्या ट्विटमध्ये नमूद केलं आहे. दुसऱ्या ट्विटमधून त्यांनी शेअर बाजारानं एक्झिट पोलचे आकडेवारी जाहीर होताच घेतलेल्या उसळीवर भाष्य केलं. 'शेअर बाजाराने गेल्या दहा वर्षांतील सर्वाधिक आकडा गाठला आहे. सध्याचे नेतृत्त्वच पुन्हा सत्तेत आल्यास भारतीय अर्थव्यवस्था अधिक जोमाने प्रगती करू शकेल, याचेच हे द्योतक आहे', असं जिंदल यांनी दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. विशेष म्हणजे त्यांनी दोन्ही ट्विटमध्ये पंतप्रधान कार्यालय, पंतप्रधान नरेंद्र मोदी व अर्थमंत्र्यांच्या कार्यालयाच्या ट्विटर हँडल्सनाही टॅग केले आहे.