नवी दिल्ली : भरधाव कारने पदपथावर झोपलेल्यांना चिरडल्याप्रकरणी (हिट अॅण्ड रन) अभिनेता सलमान खान याला निर्दोष ठरविणे म्हणजे न्यायाची थट्टा उडविणे होय, या शब्दांत अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्र सरकारची बाजू मांडली.रोहतगी यांनी २००२ मध्ये गाजलेल्या ‘हिट अॅण्ड रन’ प्रकरणाच्या तपासाचा संपूर्ण तपशील जे.एस. खेहार आणि सी. नागप्पन यांच्या खंडपीठाला सादर केला. हा खटला साक्षींवर आधारित असून, सलमानला नोटीस देण्यापूर्वी साक्षींवर विचार करायला हवा, असे सांगत खंडपीठाने पुढील सुनावणी १२ फेब्रुवारी रोजी निश्चित केली आहे. काय म्हणाले, रोहतगीसलमानने मद्यधुंद अवस्थेत लँड क्रुझर गाडी बेदरकारपणे चालवत पदपथावर झोपलेल्या एकाला चिरडले. आपण मद्य पिऊन गाडी चालवायला नको हे त्याला समजायला हवे होते, असे रोहतगी म्हणाले. सलमानचा नव्हे, तर त्याचा चालक कार चालवत होता हे १२ वर्षांनंतर समोर आलेले कथन चुकीचे असून ते मान्य केले जाऊ नये, असेही त्यांनी नमूद केले. मुंबईच्या वांद्रे भागात २८ सप्टेंबर २००२ एका बेकरीबाहेर झोपलेल्या एका इसमाला मद्यधुंद अवस्थेत कार चालवत चिरडल्याबद्दल कनिष्ठ न्यायालयाने त्याला दोषी ठरविले होते. सलमान हा दारू पिऊन कार चालवत होता हे नि:संशय पटवता आले नाही, हा आधार मानत उच्च न्यायालयाने त्याची पाच वर्षांची शिक्षा रद्दबातल ठरविली होती. सलमानचा अंगरक्षक रवींद्र पाटील याने सलमानच कार चालवत होता, अशी दिलेली साक्ष तसेच प्रमुख साक्षीदारांच्या साक्षी उच्च न्यायालयाने मान्य केल्या नव्हत्या. रवींद्र पाटील याचे २००७ मध्ये क्षयरोगाने निधन झाले.कनिष्ठ न्यायालयाने सलमानला दोषी ठरवून पाच वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली होती. मुंबई उच्च न्यायालयाने त्याला निर्दोष ठरविल्यामुळे सरकारच्या प्रयत्नांना हादरा बसला. २२ जानेवारी रोजी महाराष्ट्र सरकारने उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले. सलमानला निर्दोष ठरविल्याबद्दल महाराष्ट्र सरकार आव्हान देणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले होते.
सलमानला निर्दोष ठरविणे न्यायाची थट्टा -सरकार
By admin | Published: February 06, 2016 2:53 AM