नवी दिल्ली : देशातील न्यायिक कृतिवादाचे प्रणेते म्हणून ओळखले जाणारे भारताचे माजी सरन्यायाधीश पी.एन. भगवती यांचे अल्पशा आजाराने गुरुवारी येथे निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी प्रभावती भगवती आणि तीन मुली, असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर १७ जून रोजी अंत्यसंस्कार करण्यात येतील, असे कौटुंबिक सूत्रांनी सांगितले. भगवती देशाचे १७ वे सरन्यायाधीश होते. त्यांनी जुलै १९८५ ते डिसेंबर १९८६ यादरम्यान देशाचे हे सर्वोच्च न्यायिक पद भूषविले होते. ते गुजरात उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती होते. जुलै १९७३ मध्ये त्यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली होती. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती असताना त्यांनी जनहित याचिका आणि भारतीय न्यायिक प्रणालीप्रती संपूर्ण उत्तरदायित्व या दोन संकल्पना अस्तित्वात आणल्या. जनहित याचिकांचे कैवारी असल्यामुळे त्यांनी ‘मूलभूत अधिकाऱ्याच्या मुद्यावर कोणतीही व्यक्ती त्या मुद्याशी स्वत:चा प्रत्यक्ष संबंध नसतानाही न्यायालयाचा दरवाजा ठोठावू शकते,’ असा महत्त्वपूर्ण आदेश दिला होता. कैद्यांनाही मूलभूत अधिकार असतात, असा ऐतिहासिक निकालही त्यांनी दिला होता.
न्यायिक कृतिवादाचे प्रणेते न्या. भगवती यांचे निधन
By admin | Published: June 16, 2017 4:22 AM