जज साहेब, त्याला सोडा, नाहीतर मला दुसराच कोणीतरी घेऊन जाईल; प्रेयसीच्या मागणीवर न्यायमूर्ती भावनिक झाल्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2023 01:46 PM2023-04-04T13:46:19+5:302023-04-04T13:55:14+5:30
३० वर्षीय तरुणी एका तरुणावर गेल्या ९ वर्षांपासून प्रेम करत होती. त्याच्याशीच लग्न करायचे होते. हा व्यक्ती एका हत्या प्रकरणात १० वर्षांची शिक्षा भोगत आहे.
कर्नाटकच्या हायकोर्टात एका प्रेमप्रकरणामुळे न्यायमूर्तींना खटल्यामध्ये भावून होऊन निर्णय द्यावा लागला आहे. प्रेमाची ताकद काय करायला लावू शकते, न्यायमूर्तींनी एका तरुणीच्या मागणीवरून आरोपीला पॅरोल मंजूर केला आहे. नेमके काय घडले चला पाहुयात...
३० वर्षीय तरुणी एका तरुणावर गेल्या ९ वर्षांपासून प्रेम करत होती. त्याच्याशीच लग्न करायचे होते. हा व्यक्ती एका हत्या प्रकरणात १० वर्षांची शिक्षा भोगत आहे. त्याला पॅरोल मिळावा म्हणून तरुणीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्याला १५ दिवसांची संचित रजा मंजूर करा, म्हणजे आम्हाला लग्न करता येईल, अशी तिची मागणी होती. त्याला सोडले नाही तर माझ्या घरचे माझे लग्न दुसऱ्या कोणासोबत लावून देतील, असेही तिने म्हटले होते.
याचिकेत तिने व तिच्या होणाऱ्या सासूने कोर्टाला आनंदबाबत गॅरंटी दिली होती. तो असे कोणतेही कृत्य करणार नाही ज्यामुळे कायदा आणि पोलिसांना काही समस्या होईल, असे त्यांनी म्हटले होते. सरकारी वकिलांनी लग्नाच्या कारणासाठी पॅरोल देणे चुकीचे असल्याचे म्हटले होते. आनंद हा हत्येच्या गुन्ह्यातील आरोपी आहे. कायद्यातही लग्नाचे कारण पॅरोलसाठी दिलेले नाही, असेही त्यांनी म्हटले होते.
यावर न्यायमूर्ती एम नागप्रसन्ना यांनी हे जरी खरे असले तरी खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला कोणत्या दुसऱ्या लग्नात जाण्यास देणे चुकीचे ठरेल. जर मी त्याला आज सोडले नाही तर तरुणी आणि तो प्रेमाला मुकतील. तुरुंगात असला तरी तो त्याच्या प्रेयसीचे दुसऱ्याशी लग्न होतेय ही गोष्ट सहन करू शकणार नाही. यामुळे अपवादात्मक परिस्थितीत मी पॅरोल मंजूर करत आहे, असे सांगत ५ ते २० एप्रिल असा पॅरोल मंजूर केला आहे.