नवी दिल्ली : सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश बी. एच. लोया यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात स्वतंत्र चौकशीची मागणी करणा-या वकिलांनी अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. हे प्रकरण सोडण्यासाठी मोठ्या प्रमाणात दबावव असल्याचं या वकिलांनी सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सांगितलं. मुख्य न्यायाधीश दीपक मिश्रा, जस्टिस ए. एम. खानविलकर आणि जस्टिस डी वाय चंद्रचूड यांच्या खंडपीठाकडे ज्येष्ठ वकील दुष्यंत दवे आणि पल्लव सिसोदिया यांनी प्रकरण सोडण्यासाठी दबाव असल्याचं सांगितलं. या दोन्ही वकिलांनी जस्टिस लोया प्रकरणात स्वतंत्र चौकशीची मागणी केली आहे.आम्ही किती दबावात काम करत आहोत याची कोणी कल्पनाही करू शकत नाही. हे खूप गंभीर प्रकरण आहे. एका न्यायाधिशाचा संशयास्पदरित्या मृत्यू झाला आहे. आम्ही आमचे हात मागे बांधून काम करत आहोत. ज्या पद्धतीने गोष्टी दिसतायेत तशा त्या नाहीयेत, असं वकील दवे म्हणाले. कोर्ट गंभीर -वकिलांनी दबावाबाबत सांगितल्यानंतर हे प्रकरण अत्यंत गंभीरतेने घेत आहोत असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं. खंडपीठाने वकील दवे यांना आश्वासन दिलं की कोणीही त्यांना या प्रकरणात युक्तिवाद करण्यापासून रोखू शकत नाही. या प्रकरणावर न्यायालय अत्यंत सावधगीरीने विचार करत आहे असं मुख्य न्यायमूर्ती दीपक मिश्रा म्हणाले.
जज लोयांची केस सोडण्यासाठी प्रचंड दबाव, वकिलांचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2018 10:16 AM