नवी दिल्ली, दि. 1 - एका व्यक्तीने आपल्या पत्नीला पुन्हा मिळवून द्या असा अर्जच न्यायालयाकडे केला आहे. पीडित पतीने आपल्या पत्नीच्या माहेरचे लोक वैवाहिक जीवनात गरजेपेक्षा जास्त लक्ष घालत असल्याने आपण त्रस्त असल्याचा आरोप केला आहे. न्यायाधीश संजय गर्ग यांनी अर्जावर सुनावणी करताना याचिकाकर्त्याच्या मागणीनुसार पत्नीला नोटीस पाठवत 23 जानेवारी 2018 रोजी पुढील सुनावणी ठेवली आहे.
रोबॉटिक इंजिनिअर असलेल्या याचिकाकर्ता पतीचा आरोप आहे की, पत्नीच्या माहेरच्या लोकांचं प्रमाणापेक्षा जास्त प्रेम आणि वारंवार आमच्या वैवाहिक आयुष्यात दखल देण्याने माझं आयुष्य उद्ध्वस्त होऊ लागलं आहे. वकिल पियुष जैन यांनी हिंदू विवाह कायद्याचा 1995 मधील कलम 9 अंतर्गत याचिका दाखल करताना पत्नीला पुन्हा सासरी परतण्याचे आणि वैवाहिक आयुष्याला सुरुवात करण्याचा आदेश देण्याची मागणी केली आहे.
याचिकाकर्त्यानुसार, त्याची पत्नी एका प्रतिष्ठित कंपनीत सेक्रेटरी असून वर्षाला पाच लाख रुपये कमावते. 3 मेपासून पत्नी कोणतंही कारण न देता माहेरी जाऊन राहण्यास सुरुवात केली आहे. कोणतंही ठोस कारण नसताना पत्नी असं वागत असून, आपल्याला जबाबदारीची जाणीव आहे असं याचिकाकर्त्याने सांगितलं आहे. पत्नीच्या अशा वागण्याने आपला मानसिक छळ होत असल्याचं याचिकाकर्त्याने सांगितलं आहे.
याचिकेनुसार, 25 जानेवारी 2016 रोजी त्यांचा विवाह झाला होता. यावेळी कोणताही हुंडा घेण्यात आला नव्हता. दिल्ली - हापूड रोडवरील वेदांता फार्म हाऊसमध्ये थाटामाटात दोघांचा विवाहसोहळा पार पडला होता. पत्नीचं माहेर गाजियाबादमधील स्वर्णजयंती पुरम येथे आहे. जेव्हा लग्न झालं तेव्हा मुलाचं वय 29 आणि मुलीचं वय 26 वर्ष होतं. जवळपास वर्षभर दोघेही एकत्र होते. याचिकाकर्त्याने आरोप केला आहे की, यावेळी एकदा त्याची पत्नी गरोदरही राहिली होत, पण माहेरच्या लोकांनी व्यवस्थित काळजी न घेतल्याने तीन महिन्यातच गर्भपात करावा लागला. याचिकाकर्त्याने साररच्यांवर बेजबाबदार वागण्याचा आरोप केला आहे.
आरोप आहे की, पत्नी नेहमी माहेरी निघून जाते आणि गेली की पुन्हा येण्याचं नाव काढत नाही. माहेरी जाण्यास नकार दिला तर पत्नी भांडण सुरु करते आणि मग माहेरच्यांना बोलावून निघून जाते. आपल्या आई-वडिलांनी प्रेमाने हे प्रकरण व्यवस्थित करण्याचा प्रयत्न केला, पण पत्नी आणि तिचे कुटुंबिय तयार होत नसल्याचा आरोप पतीने केला आहे.