हैदराबाद - आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाएसआर जगनमोहन रेड्डी यांनी थेट सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश एन.व्ही. रमन्ना यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्री रेड्डींनी सरन्यायाधीशांना पत्र लिहिले आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश एन.व्ही. रमन्ना हे माजी मुख्यमंत्री आणि तेलगू देसम पक्षाचे नेते चंद्राबाबू नायडू यांच्याशी एकत्र येऊन राज्यातील सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहेत, असे रेड्डी यांनी सरन्यायाधीश एस.ए. बोबडे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
जगनमोहन यांनी 6 ऑक्टोबर रोजी सरन्यायाधीश बोबडेंना हे पत्र लिहिले असून सोमवारी ते मीडियात आले. त्यानंतर, राज्याच्या राजकारणात भूंकप झाला असून न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. मुख्यमंत्री रेड्डींचे प्रमुख सल्लागार अजेय कल्लम यांनी हैदराबादमध्ये पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भात माहिती दिली. रेड्डींनी सरन्यायाधीशांना 8 पानी पत्र लिहिले असून त्यामध्ये राज्यातील सरकार अस्थीर करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे म्हटले आहे. त्यासाठी, न्यायाधीश रमन्ना हे चंद्राबाबू यांना मदत करत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे. उच्च न्यायालयातील कामकाजात ते हस्तक्षेप करत असून न्यायाधीशांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचं रेड्डी यांनी सरन्यायाधीशांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
दरम्यान, सीएम जगन यांच्या या पत्रामुळे न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले असून राज्यातील राजकारणात याची चांगलीच चर्चा रंगली आहे. यापूर्वीही सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्यावर दबाव टाकण्यात येत असल्याचं म्हटलं होतं. त्यावेळीही, अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. आता, पुन्हा एकदा न्यायव्यवस्थेवर जाहीरपणे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.