संभल (उत्तर प्रदेश) : गेल्या महिन्यात एका प्रार्थनास्थळाच्या सर्वेक्षणावरून उसळलेल्या हिंसाचारानंतर याच्या चाैकशीसाठी नेमण्यात आलेल्या न्यायालयीन आयाेगाच्या सदस्यांनी रविवारी संभलचा दाैरा केला. अत्यंत कडेकाेट बंदाेबस्तात सदस्यांनी प्रार्थनास्थळाची पाहणी करून दंगलग्रस्त भागात काही लाेकांशी चर्चा केली. सुमारे २ महिने हा तपास सुरू राहणार आहे, असे आयोगातील सदस्यांनी सांगितले.
या दंगलीच्या चौकशीसाठी न्यायालयाने त्रिसदस्यीय आयोग नियुक्त केला असून, आयोगाचे अध्यक्ष व अलाहाबाद उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती देवेंद्रकुमार अरोरा तसेच सदस्य निवृत्त आयपीएस अरविंदकुमार जैन यांनी हा दौरा केला.
आयोगाचे तिसरे सदस्य माजी आयएएस अमित मोहनप्रसाद या दौऱ्यात उपस्थित नव्हते. दरम्यान, आयोगाचे सदस्य यानंतर पुन्हा दौरा करतील. तो दौरा कार्यक्रमानंतर जाहीर केला जाणार असल्याचे मुरादाबाद मंडळ अधिकारी आंजनेय कुमारसिंह यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)