युमनानगर - हरियाणाच्या यमुनानगर येथील शेतकरी धर्मवीर यांना कुठल्या परिचयाची गरज नाही. कारण, धर्मवीर यांच्या कार्यामुळे त्यांना राष्ट्रपती पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. विशेष म्हणजे राष्ट्रपतींच्या निवासस्थानी 21 दिवस पाहुणचाराची संधीही धर्मवीर यांना मिळाली आहे. शेतीविषयक संशोधन क्षेत्रात धर्मवीर यांचं कार्य मोठं आहे. त्यांनी आजपर्यंत अनेक मशिन्स बनविल्या असून ज्याद्वारे कित्येकांना रोजगार व उद्योग सुरू करता आला आहे. धर्मवीर यांनी आता आणखी एक हटके मिशीन बनवले आहे.
धर्मवीर यांनी मक्याच्या कणसाचे दाणे काढण्याचं मशिन बनवलं आहे, ज्या मिशनची किंमत चीनमध्ये 2 लाख 80 हजार रुपये आहे. मात्र, धर्मवीर यांनी ही मशिन केवळ 20 हजार रुपयांत बनवली आहे. यमुनानगरच्या दामला येथील शेतकरी धर्मवीर यांनी मक्याच्या कणसाचं दाणं बाहेर काढण्याचं मशिन बनवलंय. मक्याचं कणीस 18 ते 20 रुपये किलो विकण्यात येतं, तर मक्याचं पीठ बाजारात 25 रुपये किलो आहे. मात्र, स्वीट कॉर्न आणि मॅगीमध्ये मक्याच्या दाण्यांच्या उपयोग करण्यासाठी हे मशिन बनविण्यात आले आहे. मक्याचं कणीस पिकण्यापूर्वीच या मशिनच्या सहाय्याने दाणे बाहेर काढले जातील.
स्वीट कॉर्नची किंमत 40 ते 80 रुपये प्रति किलो आहे, विशेष म्हणजे 1 एकर जमिनीत तब्बल 30 क्विंटल मका निघतो. पण तोच मका पिकल्यानंतर 25 क्विंटलच पीक निघते. धर्मवीर यांनी आपल्या या मशिनच्या सहाय्याने काढलेलं दूध हरियाणाचे मुख्यमंत्री धर्मवीर यांना भेट म्हणून स्वत: जाऊन दिलं. त्यावेळी, मुख्यमंत्री खट्टर यांना संपूर्ण माहितीही समजावून सांगितली. या मक्याच्या दुधापासून केवळ दहीच नाही तर इतरही लाभदायक पदार्थ बनविता येतात, असेही खट्टर यांना सांगितले. धर्मवीर यांच्या या प्रयोगाने मुख्यमंत्रीही प्रभावित झाले आहेत. यापूर्वीही धर्मवीर यांनी अनेक मशिन्स स्वत: बनवल्या आहेत, त्या मशिन्स विदेशातही विकण्यात आल्या आहेत.