लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : सत्ताधारी भाजपच्या लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्याला केवळ भाषणबाजीने भरलेले जुमला पत्र असल्याचे काँग्रेसने रविवारी म्हटले आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, त्यांची हमी जुमल्याची हमी आहे. कारण यापूर्वी दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात भाजप अपयशी ठरले आहे. नोकऱ्या, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे आणि महागाईच्या मुद्द्यावर दिलेली आश्वासने भाजपने पूर्ण न केल्याचा आरोप काँग्रेसने केला. या सरकारने आपल्या कार्यकाळात देशातील जनता, तरुण आणि शेतकरी यांना लाभ होईल असे कोणतेही मोठे काम केले नाही, असा आरोप खरगे यांनी केला.
आमच्या जाहीरनाम्यात हे आणि हे... त्यांच्यात उल्लेखच नाही? आम्ही ३० लाख नोकऱ्या, एमएसपीची कायदेशीर हमी, प्रत्येक महिलेला एक लाख रुपये, नोकरीमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण, महागाई कमी करणार, २५ लाखांचे विमा कवच, शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि जातनिहाय जनगणना यांचे न्यायपत्र घोषित केले असताना भाजपने मात्र यातील एकाही गोष्टीचा उल्लेख केला नसल्याचे टीकास्त्र काँग्रेसने भाजपवर सोडले आहे.