नवी दिल्ली : जनता परिवाराच्या बहुचर्चित विलीनीकरणावर या आठवड्यात शिक्कामोर्तब होणार आहे. प्रामुख्याने वाद असलेले बहुतांश मुद्दे निकाली काढण्यात आले असल्याचे संयुक्त जदने (जेडी-यू) रविवारी स्पष्ट केले.मुलायमसिंग यादव यांचा समाजवादी पक्ष हा विलीनीकरण होऊ घातलेल्या जनता परिवारातील सर्वांत मोठा गट असल्याने त्यांच्याकडे नव्या एकछत्री पक्षाचे अध्यक्षपद देण्यात येईल. लोकसभेत समाजवादी पक्षाचे ५, राजदचे ४ तसेच जेडी-यू, जेडी(एस) व आयएनएलडी या पक्षाचे प्रत्येकी दोन, असे एकूण १५ खासदार आहेत. राज्यसभेत सपाचे सर्वाधिक १५, त्यापाठोपाठ जेडी-यूचे १२, तर आयएनएलडी, जेडी (एस) व राजदचे प्रत्येकी एक, असे ३० खासदार आहेत. मुलायमसिंग एक-दोन दिवसांत जेडीएसचे अध्यक्ष, माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा व आयएनएलडीचे ओमप्रकाश चौटाला यांच्याशी चर्चा करून विलीनीकरणाच्या योजनेला अंतिम स्वरूप देणार असल्याचे जेडीयूचे सरचिटणीस के.सी. त्यागी यांनी सांगितले. सप, जेडीयू व राजदने यापूर्वीच सहमती दर्शविली आहे. येत्या एक- दोन दिवसांत मुलायमसिंग पूर्वाश्रमीच्या जनता परिवारातील सर्व घटक पक्षांची बैठक बोलावतील, त्यामुळे घोषणेची औपचारिकता तेवढी उरली असल्याचे मानले जाते. नितीशकुमार यांनी गुरुवार व शुक्रवारी दिल्लीत भेटीगाठींचे सत्र पाडले. त्यांनी सोनिया गांधी, लालूप्रसाद यादव यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. मुलायमसिंग यांना तर ते तीन वेळा त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी जाऊन भेटले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
जनता परिवाराचे होणार लवकरच विलीनीकरण
By admin | Published: March 30, 2015 1:25 AM