Ramesh Bidhuri Atishi News: भाजपने कालकाजी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिलेले माजी खासदार रमेश बिधुरी त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. मागील १० दिवसात रमेश बिधुरींनी तीन वेळा वादग्रस्त विधाने केली आहेत. मुख्यमंत्री अतिशी यांच्यावर टीका करताना पुन्हा बिधुरींची जीभ घसरली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
माजी खासदार रमेश बिधुरी यांना भाजपने मुख्यमंत्री अतिशी यांच्याविरोधात उमेदवारी दिली आहे. कालकाजी विधानसभा मतदारसंघात दोघांमध्ये लढत होत असून, उमेदवारी जाहीर झाल्यापासून रमेश बिधुरी वादग्रस्त विधानांमुळेच चर्चेच्या केंद्रस्थानी राहत आहेत.
रमेश बिधुरी अतिशींना म्हणाले हरीण!
दिल्लीत बुधवारी प्रचार रॅली झाली. या प्रचारसभेत बोलताना रमेश बिधुरींनी अतिशी यांच्यावर टीका केली.
"दिल्लीतील जनता गल्ल्यांमध्ये नरक यातना भोगत आहे. गल्ल्यांची अवस्था बघा. अतिशी कधीच लोकांना भेटायला गेल्या नाहीत. पण, आता निवडणुकीच्या काळात जशी हरीण जंगलात पळते, तशाच अतिशी दिल्लीतील रस्त्यांवर हरिणीसारख्या फिरत आहेत", अशी टीका बिधुरींनी अतिशी यांच्यावर केली.
आधी म्हणाले होते, 'अतिशींनी बाप बदलला'
यापूर्वी रमेश बिधुरी यांनी ५ जानेवारी रोजी अतिशी यांच्यावर पातळी सोडत टीका केली होती. भाजपच्या परिवर्तन रॅलीत बोलताना बिधुरी म्हणाले होते की, 'अतिशींनी बाप बदलला आहे. मार्लेनाच्या त्या आता सिंह झाल्या आहेत', असे वादग्रस्त विधान त्यांनी केले होते.
प्रियांका गांधींबद्दलचे विधानही ठरले होते वादग्रस्त
त्याच दिवशी रमेश बिधुरींनी काँग्रेसच्या महासचिव आणि खासदार प्रियांका गांधी यांच्याबद्दलही वाद ओढवून घेणारे विधान केले होते.
'जसे ओखला आणि संगम विहारमधील रस्ते बनवले, तसेच कालकाजीमधील सर्व रस्ते प्रियांका गांधींच्या गालासारखे बनवेन', असे बिधुरी म्हणाले होते. टीका झाल्यानंतर बिधुरींनी माफी मागत विधान मागे घेतले होते.
अतिशींना अश्रू अनावर
बाप बदलला, या रमेश बिधुरींनी केलेल्या विधानानंतर मुख्यमंत्री अतिशींनी पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत बोलताना अतिशींना अश्रू अनावर झाले होते.
'भाजप नेते रमेश बिधुरी माझ्या ८० वर्षांच्या वडिलांना शिव्या देत आहेत. निवडणुकीसाठी तुम्ही इतकं घाणेरडं राजकारण करणार आहात का? या देशाचे राजकारण इतक्या खालच्या पातळीला जाईल, असा मी कधीही विचार केला नव्हता', अशी प्रतिक्रिया अतिशींनी दिली होती.