नवी दिल्लीकेंद्र सरकारने केलेल्या नव्या कृषी धोरणांच्याविरोधात 'चलो दिल्ली' आंदोलनत सहभागी झालेल्या पंजाब आणि हरयाणातील शेतकऱ्यांना दिल्लीच्या सीमेवरच अडवण्यात आलं आहे. आंदोलक शेतकऱ्यांना पांगवण्यासाठी पाण्याचे फवारे आणि अश्रू धुराचाराही वापर करण्यात येत आहे. तरीही शेतकऱ्यांचं आंदोलन सुरूच आहे. आंदोलक शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विट केलं आहे.
''पंतप्रधानांनी लक्षात ठेवायला हवं जेव्हा अहंकाराचा सत्याशी सामना होतो तेव्हा अहंकाराचाच पराभव होतो. सत्याच्या या लढाईत उतरलेल्या शेतकऱ्यांना जगातील कोणतच सरकार रोखू शकत नाही. मोदी सरकारला शेतकऱ्यांचं ऐकावच लागेल आणि काळे कायदे मागे घ्यावेच लागतील. ही तर फक्त सुरुवात आहे'', असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं आहे.
दिल्लीकडे कूच करणाऱ्या शेतकऱ्यांचा लोंढा वाढतच असल्याने दिल्ली पोलिसांनी राजधानीतील स्टेडियम्सचं रुपांतर तात्पुरत्या तुरुंगात करण्याची परवानगी मागितली होती. जेणेकरुन या शेतकऱ्यांना अटक करता येईल. पण दिल्ली सरकारने पोलिसांची ही मागणी फेटाळून लावली आहे.
''केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करायला हव्यात. त्यांच्या मागण्या रास्त आहेत. शेतकऱ्यांना तुरुंगात टाकण्याचं पाप आम्ही करू शकत नाही'', असं दिल्ली सरकारचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी सांगितलं.
पंजाबमधून निघालेले शेतकरी हरियाणातून दिल्लीच्या दिशेने कूच करण्यासाठी निघाले होते. काल रात्री उशिरापर्यंत शेतकरी पानीपतपर्यंत पोहोचले होते. आज शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेत प्रवेश केला आहे. दिल्ली पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये सिंधू सीमेवर झटापट झाली. शेतकऱ्यांना पांगवण्यासाठी पाण्याच्या फवाऱ्याचाही वापर करण्यात आला. पण या सगळ्याला न जुमानता शेतकरी दिल्लीकडे कूच करत आहेत.