नवी दिल्ली: हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या सुटकेबाबत भारताकडून सुरू असलेल्या प्रयत्नांना मोठं यश आलं आहे. विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची शुक्रवारी सुटका होणार असल्याची घोषणा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तानी संसदेत केली. अभिनंदन यांच्या सुटकेवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विज्ञान भवनात भाष्य केलं. एक पायलट प्रोजेक्ट सुरू होता. तो पूर्ण झाला, असं मोदी म्हणाले. यानंतर संपूर्ण सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. एक पायलट प्रोजेक्ट सुरू होता. आता फक्त प्रॅक्टिस सुरू आहे. खरं काम नंतर करायचं आहे, अशा शब्दांमध्ये मोदींनी अभिनंदन यांच्या सुटकेवर भाष्य करत पाकिस्तानला अप्रत्यक्ष इशारा दिला. दिल्लीच्या विज्ञान भवनात शांती स्वरुप भटनागर पुरस्कार सोहळ्यात मोदींनी भाषण केलं. मोदींचं भाषण सुरू होण्याच्या काही मिनिटांपूर्वी विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची सुटका होणार असल्याचं वृत्त आलं. 'भारतीय हवाई दलाचा एक वैमानिक आमच्या ताब्यात असून, शांततेसाठी पुढाकार म्हणून आम्ही त्याची उद्या सुटका करणार आहोत,' अशी घोषणा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी संसदेत केली.बुधवारी भारतीय हद्दीत घुसून हल्ला करणाऱ्या पाकिस्तानी विमानांना भारतीय हवाई दलानं चोख प्रत्युत्तर दिले होते. त्यावेळी पळ काढणाऱ्या विमानाचा पाठलाग करताना भारताचे मिग-२१ लढाऊ विमान बुधवारी (ता. २७) कोसळले. त्यावेळी विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे पाकिस्तानच्या तावडीत सापडले होते. दरम्यान, अभिनंदन यांच्या सुटकेसाठी भारताकडून आक्रमक पावले उचलण्यात आली. यासाठी पाकिस्तानशीही संपर्क साधण्यात आला होता. भारताच्या या प्रयत्नांना आज यश आलं.आज पाकिस्तानी संसदेच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करताना इम्रान खान यांनी अभिनंदन यांच्या सुटकेची घोषणा केली. 'भारतीय हवाई दलाचा एक वैमानिक आमच्या ताब्यात असून, शांततेसाठी पुढाकार म्हणून आम्ही त्याची उद्या सुटका करणार आहोत. मात्र पाकिस्तानने उचललेल्या या पावलाला पाकिस्तानचा कमकुवतपणा समजू नये. तसंच भारत आणि पाकिस्तानमधील तणावाचे मूळ हे काश्मीर आहे,' असा दावाही इम्रान खान यांनी केला.
अभिनंदन यांच्या सुटकेनंतर मोदींच्या 'त्या' विधानानंतर सभागृहात टाळ्यांचा कडकडाट
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2019 5:41 PM