नवी दिल्ली : हवाई दलाकडे असलेल्या तांत्रिक व अन्य प्रकारच्या सुविधा व क्षमता लक्षात घेता फ्रान्सकडून सध्या फक्त ३६ राफेल विमाने खरेदी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे, असे संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे.त्या म्हणाल्या की, १२६ राफेल विमानांच्या खरेदीसाठी यूपीए सरकारने प्रयत्न सुरू केले होते. मात्र, हवाई दलाची सध्याची स्थिती लक्षात घेऊन या व्यवहारासंदर्भात मोदी सरकारने २०१५ साली योग्य निर्णय घेतला. लढाऊ विमानांची एक स्क्वाड्रन ताफ्यात सामील केल्यानंतर त्याच्याशी निगडित मोठी साधनसामग्रीही खरेदी करावी लागते. लढाऊ विमानांची तातडीने खरेदी करायची झाल्यास दोन स्क्वाड्रनचा समावेश करणे केव्हाही योग्य ठरते. एकाच वेळी अधिक संख्येने विमाने घेतल्यास देखभालीचा खर्चही त्याच प्रमाणात वाढतो.भागीदार कोण असावा याच्याशी देणे-घेणे नाहीप्रत्येक राफेल विमानाची मूळ किंमत ६७० कोटी रुपये असल्याचे केंद्र सरकारने संसदेत सांगितले होते. ही किंमत जाहीर करण्याचे आश्वासन निर्मला सीतारामन यांनी गेल्या वर्षी दिले होते व ते त्यांनी पूर्ण केले. राफेल विमानांची निर्मिती करणाऱ्या डेसॉल्ट कंपनीने या व्यवहारात अनिल अंबानी यांची रिलायन्स डिफेन्स ही कंपनी आमची भागीदार असेल, असे संरक्षण मंत्रालयाला कळविले होते. त्यावेळी तुमची प्रतिक्रिया काय झाली असे विचारता त्या म्हणाल्या की, हा एका कंपनीने घेतलेला व्यावसायिक निर्णय आहे. त्याच्याशी सरकारचा काहीही संबंध नाही.
हवाई दलाच्या क्षमतेनुसारच फक्त ३६ राफेल विमाने खरेदीचा निर्णय- निर्मला सीतारामन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2018 1:21 AM