नवी दिल्ली : बस, दोन मिनट...म्हणत लहान-थोरांच्या पोटातील भूक घालवणारी मॅगी पुन्हा नव्या जोमाने बाजारात उतरण्यास सज्ज झाली आहे. निश्चित मात्रेपेक्षा अधिक शिसे आढळून आल्याने बाजारातून गायब झालेल्या मॅगीचे ९० नमुने तीन प्रयोगशाळांमधील तपासणीत ‘पास’ झाले आहेत. खुद्द नेस्ले इंडियानेच ही बातमी दिली आहे. त्यामुळे येत्या काळात ‘सुरक्षित’ मॅगीचा बाजारात आणि बाजारातून तुमच्या-आमच्या घरात पोहोचण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार तीन वेगवेगळ्या प्रयोगशाळेतील तपासणीतील मॅगीचे नमुने सुरक्षित आढळून आले आहेत. या सर्व नमुन्यांत शिसे व मोनोसोडियम ग्लुटामेटचे प्रमाण निर्धारित मात्रेनुसार आढळले आहे. कुठलाही घातक पदार्थ आढळून न आल्याने प्रयोगशाळांनी मॅगीचे सर्व नमुने सुरक्षित ठरवले आहेत, असे शुक्रवारी दिलेल्या निवेदनात नेस्ले इंडियाने म्हटले आहे.मॅगी नूडल्समध्ये शिसे व मोनोसोडियम ग्लुटामेटचे प्रमाण अधिक असल्याचे विविध चाचण्यांतून समोर आले होते. यानंतर गत जूनमध्ये मॅगीचे उत्पादन व विक्रीवर देशभर बंदी लादण्यात आली होती. यानंतर सुमारे ३० हजार टन इन्स्टंट मॅगी बाजारातून परत बोलावून कंपनीने ती नष्ट केली होती. तथापि बंदीच्या निर्णयाला कंपनीने न्यायालयात आव्हान दिले होते. त्यानुसार मुंबई उच्च न्यायालयाने मॅगीच्या नमुन्यांची नव्याने तपासणी करण्याचे निर्देश दिले होते. शिवाय या तपासणीत मॅगीची उत्पादने सुरक्षित आढळल्यास नेस्ले इंडियाला मॅगीचे उत्पादन आणि विक्री करता येईल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले होते. दरम्यान, मॅगीचा विद्यमान फॉर्म्युला कायम राहील. त्याच्या तत्त्वात कंपनी कुठलाच बदल करणार नाही, असे नेस्ले इंडियाने स्पष्ट केले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
बस, दो मिनट... मॅगी पुन्हा येणार!
By admin | Published: October 16, 2015 11:32 PM