नवी दिल्ली : गोपाळ शंकरनारायणन या ज्येष्ठ वकिलास न्यायालयीन अवमानाबद्दल कारवाई करून शिक्षा करण्याची ‘धमकी’ दिल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ न्यायाधीश न्या. अरुण मिश्रा यांनी गुरुवारी केवळ शंकरनारायणन यांचीच नव्हे तर तमाम वकीलवर्गाकडे हात जोडून ‘दंडवत’ दिलगिरी व्यक्त केल्याने गेले दोन दिवस यावरून झालेल्या वादावर सामोपचाराने पडदा पडला. यावेळी शंकरनारायणन मात्र तेथे उपस्थित नव्हते.भूसंपादन कायद्याशी संबंधित प्रकरणांची सुनावणी सध्या न्या. अरुण मिश्रा यांच्या नेतृत्वाखालील पाच न्यायाधीशांच्या घटनापीठापुढे सुरू आहे. त्यात शंकरनारायणन मंगळवारी एका पक्षकाराच्या वतीने युक्तिवाद करण्यास उभे राहिले. शंकरनारायणन यांनी नेमका कोणत्या मुद्यावर व कसा युक्तिवाद करावा, यावरून त्यांची आणि न्या. मिश्रा यांची शाब्दिक खडाजंगी झाली. एका टप्प्याला न्या. मिश्रा यांनी ‘आता एक शब्द जरी पुढे बोललात तर कन्टेम्प्टची कारवाई करून शिक्षा करीन’, असे शंकरनारायणन यांना बजावले. यानंतर शंकरनारायणन युक्तिवाद अर्धवट टाकून तावातावाने न्यायालयातून निघून गेले होते.या पार्श्वभूमीवर कपिल सिब्बल, दुष्यंत दवे, मुकुल रोहटगी, डॉ. अभिषेक मनू सिंघवी व सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांच्यासह काही ज्येष्ठ वकिलांनी गुरुवारी सकाळी न्या. मिश्रा यांच्या कोर्टात जाऊन हा विषय काढला. वकील आणि न्यायाधीश यांनी आपापले मन मोकळे केले. त्यामुळे सलोखा बिघडून कटुता येणार नाही, याची काळजी दोघांनीही घ्यायला हवी, यावर सहमत होते.काय म्हणाले, न्या. मिश्रा?न्या. मिश्रा यांनी दिलगिरी व्यक्त केली. ते म्हणाले की, माझ्यामुळे कोणी दुखावले गेले असेल तर मी माफी मागतो. केवळ शंकरनारायणनच नव्हेत तर अगदी २० वर्षांच्या नवोदित वकिलाचीही शतश: ‘दंडवत’ माफी मागण्याची माझी तयारी आहे. त्यांनी शंकरनारायणन यांना भावी उज्ज्वल कारकीर्दीसाठी शुभेच्छाही दिल्या.
न्या. अरुण मिश्रांची वकिलांना हात जोडून ‘दंडवत दिलगिरी!’
By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2019 6:14 AM