नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी न्यायमूर्ती धनंजय वाय. चंद्रचूड यांची देशाचे ५०वे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांचा कार्यकाळ ९ नोव्हेंबर २०२२ पासून सुरू होत आहे. केंद्रीय कायदामंत्री किरेन रिजिजू यांनी ट्विट करून ही माहिती दिली.विद्यमान सरन्यायाधीश न्यायमूर्ती
यू. यू. लळीत यांचा कार्यकाळ ८ नोव्हेंबर रोजी संपत आहे. सरकारने ७ ऑक्टोबर रोजी लळीत यांना पत्र लिहून त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांची शिफारस करण्याची विनंती केली होती. याला उत्तर म्हणून सरन्यायाधीश लळीत यांनी न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांचे नाव पाठवले होते. त्यास राष्ट्रपतींनी संमती दिली आहे.
ज्येष्ठता यादीनुसार, न्यायमूर्ती चंद्रचूड हे विद्यमान सरन्यायाधीश लळीत यांच्यानंतर सर्वांत ज्येष्ठ आहेत. न्या. चंद्रचूड यांचा कार्यकाळ १० नोव्हेंबर २०२४ पर्यंत असेल. न्यायमूर्ती चंद्रचूड हे अयोध्या जमीन विवाद आणि गोपनीयतेचा अधिकार यासारख्या ऐतिहासिक निकालांचा भाग आहेत.