नवी दिल्ली : याचिकांच्या वाटपाबाबत मार्गदर्शक तत्वे ठरवावीत, अशी विनंती करणाऱ्या माजी केंद्रीय कायदामंत्री शांती भूषण यांची जनहित याचिका दाखल करून घेण्यास सुप्रीम कोर्टातील सर्वात ज्येष्ठ न्यायाधीश जे. चेलमेश्वर यांनी गुरुवारी नकार दिला.मला काहीतरी मिळवायचे आहे, असा माझ्याविरोधात अपप्रचार सुरू आहे. त्यामुळे ही याचिका मी दाखल करुन घेणार नाही. सध्या देशात काय सुरु आहे हे सर्वांनाच माहीत आहे. मी दिलेला आदेश २४ तासांत कोणीतरी रद्द केला हे मला पाहायचे नाही, असे त्यांनी बोलून दाखवले. सुप्रीम कोर्टातील काही खटकणाºया गोष्टींबद्दल न्या. चेलमेश्वर यांनी अलीकडेच दोन पत्रे लिहिली असून, न्या. कुरियन जोसेफ यांनी देखील कामकाजात कार्यकारी मंडळाच्या हस्तक्षेपाचा आरोप केला होता.त्यानंतर शांती भूषण यांचे पुत्र व प्रशांत भूषण यांनी सरन्यायाधीश दीपक मिस्रा यांच्या खंडपीठाकडे याचिकेवर तातडीने सुनावणीची विनंती केली होती. त्यावर यात लक्ष घालण्याचे खंडपीठाने स्पष्ट केले. शांती भूषण यांनी याचिकेत रोस्टर संकल्पनेला आव्हान दिले आहे. नोव्हेंबरमध्ये न्या. चेलमेश्वर यांनी दिलेला आदेश सरन्यायाधीशांच्या खंडपीठाने बदलायला लावला होता. आदेश बदलताना कोणती याचिका कोणाकडे पाठवायची याचा निर्णय सरन्यायाधीशच घेतील, असे न्या दीपक मिस्रांच्या खंडपीठाने म्हटले आहे. त्यामुळे चेलमेश्वर दुखावले गेले आहेत.
न्या. चेलमेश्वर यांचा कामाच्या वाटपाबाबतच्या याचिकेला नकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 4:12 AM