महाराष्ट्रासाठी आज आणखी एक अभिमानाचा दिवस उजाडला आहे. डी. वाय. चंद्रचूड यांनी आज देशाचे ५० वे सरन्यायाधीश होण्याचा मान मिळविला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी चंद्रचूड यांना शपथ दिली. महाराष्ट्राचेच मावळते सरन्यायाधीश उदय लळीत यांची जागा चंद्रचूड यांनी घेतली आहे. लळीत ८ नोव्हेंबरला निवृत्त झाले. त्यापूर्वी ७ नोव्हेंबरला त्यांना निरोप देण्यात आला.
न्या. चंद्रचूड यांचा अनेक घटनापीठांत तसेच अयोध्या वाद, गोपनीयतेचा अधिकार व व्यभिचार यासारख्या प्रकरणांसह अनेक ऐतिहासिक निवाड्यांत सहभाग आहे. न्यायमूर्ती चंद्रचूड यांची १३ मे २०१६ रोजी पदोन्नतीने सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली होती. ते देशाचे सरन्यायाधीशपद प्रदीर्घ काळ भूषविलेले न्यायमूर्ती वाय. व्ही. चंद्रचूड यांचे पुत्र आहेत.
देशाच्या इतिहासात हा योग पहिल्यांदाच आला आहे. वडिलांनंतर त्यांचा मुलगा देखील सर्वोच्च न्यायसंस्थेचे सर्वोच्च पद सांभाळणार आहे. डी वाय चंद्रचूड यांचे वडील यशवंत विष्णु चंद्रचूड़ हे देशाचे १६ वे सरन्यायाधीश होते. त्यांचा कार्यकाळ हा २२ फेब्रुवारी १९७८ ते ११ जुलै, १९८५ एवढा प्रदीर्घ म्हणजेच सात वर्षांचा राहिला होता. ते रिटायर झाल्यानंतर ३७ वर्षांनी त्यांचा मुलगा सीजेआयपदी नियुक्त झाला आहे.
डी वाय चंद्रचूड यांनी आपल्याच वडिलांचे दोन महत्वाचे निर्णय बदलले होते. ते धडक निर्णयांसाठी देखील चर्चेत असतात. चंद्रचूड यांचा कार्यकाळ ९ नोव्हेंबर २०२२ ते १० नोव्हेंबर २०२४ असा दोन वर्षांचा असणार आहे.
अमेरिकेत एलएलएम, पीएच.डी.अर्थशास्त्रात बीए ऑनर्स पदवीनंतर न्या. चंद्रचूड यांनी दिल्ली विद्यापीठाच्या कॅम्पस लॉ सेंटरमधून विधी पदवी मिळवली. अमेरिकेच्या हॉर्वर्ड लॉ स्कूलमधून एलएलएम पदवी व न्याय वैद्यक शास्त्र विषयात पीएच.डी. प्राप्त केली. त्यांनी मुंबई उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयात वकिली केली. मुंबई विद्यापीठात घटनात्मक कायदा विषयाचे अतिथी व्याख्याता म्हणून अध्यापन कार्य केले.