दिल्ली हायकोर्टामधून कलकत्ता हायकोर्टामध्ये बदली झालेले न्यायमूर्ती गौरांग कंठ यांनी दिल्लीपोलिसांचे जॉईंट पोलीस कमिश्नर (सिक्युरिटी) यांना पत्र लिहिलं आहे. न्यायमूर्ती कंठ यांनी आरोप केला की, पोलीस कर्मचाऱ्यांच्या बेफिकीरीमुळे त्यांच्या पाळीव कुत्र्याचा मृत्यू झाला. त्यामुळे दोषी पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी केली आहे.
कलकत्ता हायकोर्टाचे न्यायमूर्ती गौरांग कंठ यांनी आपातकालिन परिस्थितीत बंगल्याचा दरवाजा उघडण्यात अपयशी ठरलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलीस कर्मचाऱ्यांच्या अकार्यक्षमतेमुळे आपल्या पाळीव कुत्र्याचा मृत्यू झाला, असा आरोप त्यांनी पत्रातून केला. दरम्यान, कंठ यांनी जेसीपीच्या माध्यमातून अधिकाऱ्यांविरोधात अनुशासनात्मक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
जस्टिस कंठ यांनी यांनी आपल्या पत्रात लिहिले की, मी हे पत्र खूप दु:खी आणि क्रोधित अंत:करणाने लिहित आहे. माझ्या बंगल्याच्या सुरक्षेमध्ये तैनात असलेल्या अधिकाऱ्यांच्या अयोग्यतेमुळे माझ्या पाळीव कुत्र्याचा मृत्यू झाला आहे. मी बंगल्यावर तैनात सुरक्षा रक्षकांना दरवाजा बंद ठेवण्याबाबत सातत्याने सांगत होतो. मात्र त्यांनी माझ्या सूचनांकडे दुर्लक्ष केलं. तसेच आपली व्यावसायिक जबाबदारी पार पाडण्यात अपयशी ठरले. कर्तव्यावरील अशा प्रकारची अपात्रता आणि दुर्लक्षावर तत्काळ लक्ष देण्याची गरज आहे. अशा प्रकारे माझ्या जीवनालाही धोका निर्माण होऊ शकतो. सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या अशा बेफिकीरीमुळे माझ्यासोबतही कुठलीही दुर्घटना होऊ शकते. मी स्वत:च्या सुरक्षेबाबत चिंतीत आहे. अशा अधिकाऱ्यांना त्वरित निलंबित करण्यात यावं, अशी मी तुमच्याकडे मागणी करतो.