ऑनलाइन लोकमत
कोलकाता. दि. 8 - उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनाच शिक्षा सुनावल्याचे तुम्ही कधी ऐकलेय का? अशी विचित्र आणि दूर्मीळ घटना आज भारतीय न्यायपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच घडली आहे. कलकत्ता उच्च न्यायालयाचे वादग्रस्त न्यायाधीश जी. एस. कर्णन यांनी भारताचे सरन्यायाधीश जे. एस. खेहर यांच्यासह सात अन्य न्यायाधीशांना 5 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.
गेल्या काही दिवसांपासून न्या. कर्णन आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींमध्ये वाद सुरू आहे. त्यातूनच आज न्यायमूर्ती कर्णन यांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश जे.एस. खेहर, न्यायमूर्ती दीपक मिश्रा, न्या. जे. चेलमेश्वर, न्या. रंजन गोगोई, न्या मदन बी. लोकूर, न्या. पिनाकी चंद्र घोष आणि न्या. कुरियन जोसेफ यांना पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. या आठही न्यायाधीशांना 1989 च्या अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन कायदा आणि संशोधिक कायदा अन्वये दोषी ठरवत कर्णन यांनी ही शिक्षा सुनावली आहे.
न्यायपालिकेच्या अवमानाच्या आरोपांचा सामना करत असलेल्या कर्णन यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयाने स्वत:च दखल घेत कारवाई केली होती. तसेच त्यांच्या न्यायिक आणि प्रशासनिक कामकाजात भाग घेण्यास स्थगिती दिली होती. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मानसिक स्वास्थ चाचणी करण्याच्या आदेशासही कर्णन यांनी केराची टोपली दाखवली होती.
सर्वोच्च न्यायालयाच्या 8 न्यायाधीशांनी जातीवाचक भेदभाव केला आहे. त्यामुळे मी त्यांना 1989 च्या अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन कायदा आणि संशोधिक कायदा अन्वये दोषी ठरवले आहे, असे न्यायमूर्ती कर्णन यांनी या निकालाविषयी माहिती देताना सांगितले.