नवी दिल्ली- सीबीआयचे विशेष न्यायमूर्ती बी. एच. लोया यांच्या मृत्यू प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी होणार नाही, असं सर्वोच्च न्यायालयानं सुनावणीदरम्यान स्पष्ट केलं आहे. तसेच न्या. लोया यांच्या चौकशीची मागणी करणा-या याचिकाही सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावल्या. न्या. बी. एच. लोया यांच्या मृत्यूची एसआयटीमार्फत चौकशी करण्याचं कोणतंही कारण नाही. तसेच या याचिकांमुळे न्यायव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित राहू शकतं, न्यायमूर्ती लोयांचा मृत्यू हा नैसर्गिकच आहे. त्यामुळे त्याची स्वतंत्रपणे चौकशीची गरज नाही. तसेच या याचिका म्हणजे न्यायव्यवस्थेला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे, असं म्हणत सर्वोच्च न्यायालयाच्या त्रिसदस्यीय खंडपीठानं याचिकाकर्त्यांनाही फटकारलं. काँग्रेस नेते तहसीन पूनावाला, पत्रकार बी. एस. लोणे, बॉम्बे लॉयर्स असोसिएशनसहीत इतर पक्षकारांनी न्या. लोया यांच्या मृत्यूची निष्पक्ष चौकशी करण्यासाठी याचिका दाखल केल्या होत्या. सरन्यायाधीश दीपक मिश्रा आणि न्या. ए. एम. खानविलकर, डी. वाय. चंद्रचूड यांच्या न्यायपीठाने न्या. बी. एच. लोया यांच्या मृत्यू प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्यास नकार दिला आहे.
न्या. लोया यांच्या मृत्यूची एसआयटीमार्फत चौकशी होणार नाही- सर्वोच्च न्यायालय
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2018 11:02 AM