नवी दिल्ली : कोलकात्याच्या सरकारी रुग्णालयातील डॉक्टर्सच्या मंडळाकडून कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश सी.एस. कर्नान यांची ४ मेपर्यंत वैद्यकीय तपासणी करावी, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.न्या. कर्नान यांची वैद्यकीय तपासणी पार पाडण्यासाठी स्थापन होणाऱ्या वैद्यकीय मंडळाला मदत करण्यासाठी पोलिसांची चमू स्थापन करण्याचा आदेशही सरन्यायाधीश जे.एस. केहार यांनी प. बंगालच्या पोलीस महासंचालकांना दिला आहे. केहार यांच्या नेतृत्वात सात न्यायाधीशांचे खंडपीठ या प्रकरणाची सुनावणी करीत आहे. या खंडपीठाने यापूर्वीच्या आदेशात न्या. कर्नान यांना प्रशासकीय आणि न्यायालयीन अधिकार वापरण्याला मनाई केली आहे. ८ फेब्रुवारीनंतर न्या. कर्नान यांनी दिलेला कोणताही आदेश न्यायालय, लवाद किंवा आयोगांनी मान्य करू नये, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले होते. खंडपीठाने न्या. कर्नान यांना अवमानना नोटीसवर उत्तर मागितले असून ८ मेपर्यंत कोणतेही उत्तर न दिल्यास तुम्हाला काहीही सांगायचे नाही, असे मानले जाणार असल्याचे नमूद केले. यापूर्वी खंडपीठासमक्ष हजर होताना न्या. कर्नान यांनी आपले न्यायालयीन आणि प्रशासकीय अधिकार शाबूत राखण्याची विनंती केली होती. खंडपीठाने यापूर्वीच्या आदेशात सुधारणा न करण्यास नकार दिल्यानंतर न्या. कर्नान यांनी पुन्हा न्यायालयात हजर होणार नसल्याचे ठामपणे सांगितले होते. (वृत्तसंस्था)पत्रांची स्वत:हून दखल...न्या. कर्नान यांनी मद्रास उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांविरुद्ध लिहिलेल्या विविध पत्रांची सर्वोच्च न्यायालयाने स्वत:हून दखल घेतली आहे. अवमानना याचिकेवर न्या. कर्नान ३१ मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयात उपस्थित झाले तेव्हा न्यायालयाने त्यांना उत्तरासाठी चार आठवड्यांची मुदत दिली होती. भारताच्या न्यायालयीन इतिहासात एखाद्या न्यायाधीशाने स्वत:हून खंडपीठासमोर हजेरी लावण्याची ती पहिलीच वेळ होती.
न्या. कर्नान यांची वैद्यकीय तपासणी करा
By admin | Published: May 02, 2017 12:59 AM