नवी दिल्ली: लोकांचा भूतकाळ पाहून मी त्यांची पारख करत नाही. त्याऐवजी मी त्यांची कृती आणि दृष्टीकोन लक्षात घेतो. त्यातूनच मी त्यांना पारखतो, असं सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी म्हटलं आहे. सरन्यायाधीश म्हणून आपल्या अखेरच्या भाषणात मिश्रा यांनी न्यायव्यवस्थेशी संबंधित अनेक मुद्यांवर भाष्य केलं. भारतीय न्यायव्यवस्था जगातील एक भक्कम न्यायव्यवस्था असल्याचं प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं. न्यायाला मानवी चेहरा असायला हवा, असं दीपक मिश्रा यांनी भाषणात म्हटलं. 'मी बार असोसिएशनबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. माझ्या कारकिर्दीबद्दल मी पूर्णपणे संतुष्ट आहे. आपली न्यायव्यवस्था जगातील सर्वात भक्कम न्यायव्यवस्थांपैकी एक असून यात न्यायाधीशांची भूमिका महत्त्वाची आहे,' असं मावळत्या सरन्यायाधीशांनी म्हटलं. यावेळी त्यांनी तरुण वकिलांची मुक्तकंठानं स्तुती केली. तरुण वकिलांकडे अफाट क्षमता असल्याचं ते म्हणाले.
न्यायाला मानवी चेहरा असावा- सरन्यायाधीश दीपक मिश्रा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2018 7:57 PM