नवी दिल्ली: भारताचे ४८वे सरन्यायाधीश म्हणून न्या. एन. व्ही. रमणा (nv ramana) यांनी शपथ घेतली. २३ एप्रिल रोजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांचा कार्यकाळ संपुष्टात आला. त्यानंतर लगेचच २४ एप्रिल रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी न्या. एन. व्ही. रमणा यांना सरन्यायाधीशपदाची शपथ दिली. मावळते सरन्यायाधीश शरद बोबडे यांनीच न्या. रमणा यांच्या नावाची शिफारस केली होती. (justice nv ramana takes oath as the new chief justice of india)
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी न्या. रमणा यांच्या नियुक्ती पत्रावर अलीकडेच स्वाक्षरी केली. न्या. एन. व्ही. रमणा यांचे वय ६४ वर्षे असून, पुढील १६ महिन्यांपर्यंत ते सरन्यायाधीशपदी कार्यरत असतील. न्या. एन. व्ही. रमणा यांचा कार्यकाळ २६ ऑगस्ट २०२२ रोजी संपुष्टात येणार आहे. तोपर्यंत न्या. रमणा हे सरन्यायाधीश पदावर असतील, असे सांगितले जात आहे. २७ जून २००० साली त्यांची आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती झाली होती. १० मार्च २०१३ ते २० मे २०१३ या कालावधीत त्यांनी आंध्र प्रदेश उच्चन्यायालयाच्या कार्यवाहक मुख्य न्यायाधीश पदाचं काम पाहिलं आहे.
शेतकऱ्याचा मुलगा ते सरन्यायाधीश
न्या. रमणा यांचे पूर्ण नाव नाथुलापती वेंकट रमणा असून, २७ ऑगस्ट १९५७ रोजी आंध्र प्रदेशातील पोन्नावरम गावातील एका शेतकरी कुटुंबात झाला. १० फेब्रुवारी १९८३ पासून आपल्याला वकिलीला सुरुवात केली. न्यायमूर्ती रमणा यांचे बी.एस्सी, बी.एल. शिक्षण झालेले असून, संविधान आणि फौजदारी आणि आंतरराज्य नदी कायद्यांमध्ये त्यांनी स्पेशलायझेशन केलेले आहे. १३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर काही काळ आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून काम पाहिल्यावर ०२ सप्टेंबर २०१३ रोजी त्यांची दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली. दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून काम पाहिल्यानंतर १७ फेब्रुवारी २०१४ रोजी न्या. रमणा यांची नियुक्ती सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून करण्यात आली.
'अशी' आहे न्या. एन. व्ही. रमणा यांची कारकीर्द
सरन्यायाधीश शरद बोबडे सेवानिवृत्त
ऐतिहासिक अयोध्या प्रकरण, नागरिकत्व सुधारण कायदा, स्थलांतरीत मजूर, कृषी कायदे यांसहीत अनेक मुद्यांवर सुनावणी करणारे सरन्यायाधीश शरद अरविंद बोबडे हे आज २३ एप्रिल रोजी निवृत्त झाले. आपल्या कार्यकाळाच्या शेवटच्या दिवशी सरन्यायाधीशांनी स्वत:हून लक्ष घातलेल्या कोव्हिड १९ संदर्भात सुनावणी केली. न्यायाधीश म्हणून केलेलं काम आणि अनुभव समृद्ध करणारा होता, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.