"न्याय मिळाला, लोकशाही जिंकली! सत्याच्या या लढाईत..."; आव्हाडांची सरकारवर खोचक टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2023 05:45 PM2023-08-04T17:45:32+5:302023-08-04T17:47:13+5:30
राहुल गांधींना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिल्यानंतर केलं ट्विट
Jitendra Awhad, Rahul Gandhi: मोदी आडनाव बदनामी प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना उच्च न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आणि त्यांची खासदारकी रद्द केली. तसेच पुढील सात वर्षे त्यांना निवडणूकही लढविता येणार नाही असे सांगितले. पण सर्वोच्च न्यायालयाने मात्र या मुद्द्यावर राहुल गांधींना दिलासा दिला आहे. राहुल गांधी यांच्या या प्रकरणातील शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली असल्याने, ते पुन्हा एकदा खासदार होऊन संसदेत येणार आहेत. या निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत सरकारवर टीका केली.
"न्याय अबाधित राहिला, लोकशाहीचा विजय झाला! सरकारवरील टीकेचा सर्वात मजबूत आणि मोठा आवाज दाबण्याचा प्रयत्न करूनही, सत्याच्या या लढाईत राहुल गांधी विजयी झाले. मला खात्री आहे की आपल्या देशाचा लोकशाही पाया पुन्हा स्थापित करण्याचा त्यांचा दृढ निश्चय त्यांना पुढील वाटचालीत विजयाच्या दिशेने नेईल. INDIAच्या अनेक यशांपैकी हे सर्वात महत्त्वाचे यश मानले जाईल. लढेल INDIA, जिंकेल भारत!" अशा शब्दांत आव्हाड यांनी केंद्रातील भाजपा सरकारवर टीका केली.
दरम्यान, राहुल यांना सर्वप्रथम गुजरातमधील विशेष न्यायालयाने शिक्षा सुनावली. त्यानंतर राहुल गांधींना उच्च न्यायालयात दिलासा मिळाला नव्हता, म्हणून ते सर्वोच्च न्यायालयाच गेले होते. या याचिकेवर आज सुनावणी झाली. यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने या पेक्षा कमी शिक्षा देखील करता आली असती, अशी टिप्पणी केली आहे. राहुल गांधी यांच्या विरोधात युक्तिवाद करणाऱ्या तक्रारदार पूर्णेश मोदी यांचे ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले आहे. राहुल गांधी यांना सुरतच्या न्यायालयाने जास्तीत जास्त शिक्षा देण्यासाठी कोणती कारणे दिली आहेत. यापेक्षा कमी शिक्षा देता आली असती. त्यामुळे लोकसभा मतदारसंघातील जनतेचे हक्कही अबाधित राहिले असते, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले.