नवी दिल्ली- सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांच्याविरोधात बंडाचा पवित्रा घेतलेल्या 4 न्यायाधीशांच्या आरोपांना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गंभीर असल्याचं म्हटलं आहे. ते म्हणाले, न्यायाधीश लोया यांच्या मृत्यूची उच्चस्तरीय चौकशी व्हावी. लोकशाही धोक्यात असून, वेळीच खबरदारी घेतली पाहिजे.चार न्यायाधीशांनी उपस्थित केलेले प्रश्न गंभीर आहेत. यावर योग्य विचार होण्याची गरज आहे. अशा प्रकारच्या घटना याआधी कधीही घडल्या नाहीत. हे एक अभूतपूर्व प्रकरण आहे. भारताच्या सर्व नागरिकांचं न्यायव्यवस्थेवर प्रेम आहे, न्यायाधीशांच्या प्रश्नांचं लवकरच निराकरण व्हायला हवं. न्या. लोया मृत्यू प्रकरणात योग्य चौकशी व्हावी, तसेच हे प्रकरण न्यायमूर्तींनी योग्य प्रकारे हाताळण्याची गरज असल्याचं मत राहुल गांधी यांनी मांडलं आहे. न्यायाधीशांच्या वादाचा लोकशाहीवर होणार परिणाम- सुरजेवालाकाँग्रेस प्रवक्ते रणजित सुरजेवाला यांनीही न्यायाधीशांच्या वादामुळे काँग्रेस अस्वस्थ असल्याचं म्हटलं आहे. याचे लोकशाहीवर दूरगामी परिणाम होतीत. न्यायाधीश लोया यांच्या मृत्यूवरही न्यायाधीशांनी सवाल उपस्थित केले आहेत, असंही सुरजेवाला म्हणाले आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि सरन्यायाधीशांमधल्या वादानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या निवासस्थानी काँग्रेसनं बैठक झाली. या बैठकीत काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि ज्येष्ठ वकील सलमान खुर्शीद, मनीष तिवारी आणि पी. चिदंबरम सहभागी झाले होते.
गेल्या काही दिवसांपासून न्यायाधीशांच्या नियुक्तीच्या कॉलेजियम पद्धतीवरून सरकार आणि न्याय संस्थेमध्ये तणाव निर्माण झाल्याचे चित्र आहे. तसंच सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक खटल्याची सुनावणी घेणारे सीबीआयचे न्या. बी.एच. लोया यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणाशीही याचा संबंध जोडला जात आहे.