नवी दिल्ली : सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी भारताचे ४८ वे सरन्यायाधीश म्हणून एन. व्ही. रमण यांच्या नावाची शिफारस केली आहे. सरन्यायाधीश बोबडे २३ एप्रिलला निवृत्त होत आहेत.
ज्येष्ठता क्रमाच्या नियमांचे पालन करून सरन्यायाधीश बोबडे यांनी न्या. रमण यांच्या नावाची शिफारस केली. त्यांनी आपली शिफारस सरकारकडे पाठविली आहे. नियमांनुसार विद्यमान सरन्यायाधीश सेवानिवृत्तीच्या एक महिना आधी आपल्या उत्तराधिकाऱ्याची लेखी शिफारस करतात. सरकारने त्यांची शिफारस मंजूर करण्यात आल्यास न्या. रमण हे २४ एप्रिल रोजी भारताचे सरन्यायाधीश म्हणून पदभार सांभाळतील. ते २६ ऑगस्ट २०२२ रोजी निवृत्त होतील. सरन्यायाधीश बोबडे यांची शिफारस सरकारकडून मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठविली जाईल.
न्य. रमण यांचा जन्म २७ ऑगस्ट १९५७ रोजी आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील पुन्नावरम गावात झाला. १० फेब्रुवारी १९८३ रोजी त्यांनी वकिली सुरू केली. २७ जून २००० रोजी त्यांची आंध्र प्रदेशचे कायमस्वरूपी प्रभारी न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. ते १० मार्च २०१३ ते २० मे २०१३ पर्यंत आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते. २ सप्टेंबर २०१३ मध्ये त्यांना दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून बढती देण्यात आली. १७ फेब्रुवारी २०१४ रोजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली.