नवी दिल्ली : न्या. रंजन गोगोई यांची सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गोगोईंच्या नियुक्तीची घोषणा केली. आज 3 ऑक्टोबर रोजी गोगोई यांनी 46 वे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला आहे. बुधवारी सकाळी 10.45 वाजता राष्ट्रपती भवनामध्ये शपथ विधी सोहळ्याचं आयोजन करण्यात आले आहे.
रंजन गोगोईं यांच्या निमित्ताने प्रथमच ईशान्य भारतातील व्यक्ती सरन्यायाधीशपदी नियुक्त होत आहे. 17 नोव्हेंबर 2019 पर्यंत गोगोई सरन्यायाधीशपदी कार्यरत राहणार आहेत. न्या. रंजन गोगोई यांचा जन्म 18 नोव्हेंबर 1954 रोजी आसाममध्ये झाला. 28 फेब्रुवारी 2001 रोजी गुवाहाटी उच्च न्यायालयाचे ते न्यायाधीश बनले होते. त्यानंतर 12 फेब्रुवारी 2011 रोजी ते पंजाब-हरयाणा हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश बनले. 23 एप्रिल 2012 मध्ये त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदाची जबाबदारी स्वीकारली.
न्या. रंजन गोगोईं यांच्यासमोर 'ही' आहेत आव्हानं
सरन्यायाधीशपदी नियुक्त झाल्यानंतर रंजन गोगोई यांच्यासमोर अनेक आव्हानं असणार आहेत. अयोध्या प्रकरणावर सुनावणी हे गोगोई यांच्यासमोरील सर्वात मोठे आव्हान आहे. तसेच प्रलंबित खटले निकाली काढण्याची महत्वाची कामं आहेत. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच गेल्या वर्षी ज्या चार न्यायमूर्तींनी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रक्रियेवर आक्षेप घेतले होते त्यामध्ये गोगोई यांचाही समावेश होता.