नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठतम न्यायाधीश आणि नागपूरचे सुपुत्र न्या. शरद अरविंद बोबडे यांनी सोमवारी भारताच्या सरन्यायाधीशपदाची सूत्रे स्वीकारली. न्या. बोबडे १७ महिने म्हणजे २३ एप्रिल, २०२१ पर्यंत हे पद भूषवतील. न्या. प्रल्हाद गजेंद्रगडकर व न्या. यशवंत चंद्रचूड यांच्यानंतर हे तिसरे मराठी सरन्यायाधीश आहेत.राष्ट्रपती भवनात झालेल्या समारंभात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी न्या. बोबडे यांना सरन्यायाधीशपदाची शपथ दिली. न्या. बोबडे यांनी ईश्वराला स्मरून शपथ घेतली. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, अनेक केंद्रीय मंत्री, माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी व माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. न्या. बोबडे यांच्या ९१ वर्षांच्या मातोश्री श्रीमती मुक्ता बोबडे प्रकृती बरी नसूनही मुलाच्या आयुष्यातील अत्युच्च मानाचा क्षण डोळ्यांत साठविण्यासाठी उपस्थित होत्या. शपथविधीनंतर न्या. बोबडे यांनी आई श्रीमती मुक्ता यांचे पदस्पर्श करून आशीर्वाद घेतले. त्यावेळी त्या भावनाविवश झाल्या होत्या. न्या. बोबडे यांच्या रुक्मिणी व सावित्री या कन्या आणि चिरंजीव श्रीनिवास यांनी वडिलांचे अभिनंदन केले.न्या. बोबडे यांचे अनेक मित्र, चाहते व महाराष्ट्रातून गेलेल्या वकील मंडळीपैकी अनेकांना राजशिष्टाचाराच्या बंधनांमुळे शपथविधीला हजर राहता आले नाही. त्यांनी रविवारी व आज न्यायालयात, तसेच घरी जाऊन त्यांचे अभिनंदन केले.
न्या. शरद बोबडे सरन्यायाधीशपदी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2019 3:32 AM