नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयातील सर्वांत ज्येष्ठ न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे सरन्यायाधीश होणार असल्याचं निश्चित झालं आहे. ते मूळचे नागपूरचे आहेत. प्रथेनुसार न्या. रंजन गोगोई यांनी न्या. बोबडे यांची सरन्यायाधीशपदी नियुक्ती करण्याची शिफारस केंद्र सरकारला केली होती. त्यांच्या नियुक्ती पत्रावर राष्ट्रपतींनी शिक्कामोर्तब केलं असून, न्या. बोबडे 47 वे सरन्यायाधीश होणार आहेत.न्या. गोगोई 17 नोव्हेंबर रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे न्या. बोबडे 18 नोव्हेंबरला सरन्यायाधीशपदाची शपथ घेणार आहेत.न्या. बोबडे यांचे आजोबा अॅड. श्रीनिवास बोबडे ख्यातनाम वकील होते. वडील अरविंद बोबडे हे राज्याचे दोनदा महाधिवक्ता होते, तर ज्येष्ठ बंधू विनोद बोबडे सर्वोच्च न्यायालयात वरिष्ठ वकील होते. न्या. बोबडे हे दुसरे नागपूरकर सरन्यायाधीश होतील. यापूर्वी नागपूरचे एम. हिदायतुल्ला यांची 25 फेब्रुवारी 1968 रोजी सरन्यायाधीशपदी नियुक्ती झाली होती. न्या. बोबडे यांचा जन्म 24 एप्रिल 1956 रोजी नागपुरात झाला. त्यांनी मुंबई उच्च तसेच सर्वोच्च न्यायालयात अनेक प्रकरणांत यशस्वी युक्तिवाद केला. त्यांची 29 मार्च 2000 रोजी मुंबई उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायमूर्तीपदी नियुक्ती झाली.दोन वर्षांनंतर ते कायम न्यायमूर्ती झाले. ते 16 ऑक्टोबर 2012 रोजी मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती झाले. त्यानंतर 12 एप्रिल 2013 रोजी त्यांना सर्वोच्च न्यायालयात बढती मिळाली. न्या.बोबडे यांना सरन्यायाधीश म्हणून 523 दिवसांचा कार्यकाळ मिळेल. आतापर्यंत 46 पैकी 16 सरन्यायाधीशांनाच 500हून अधिक दिवसाचा कार्यकाळ मिळाला आहे. सरन्यायाधीश एस. एच. कपाडिया यांना सर्वाधिक 870 दिवसांचा कार्यकाळ मिळाला होता.
न्यायमूर्ती शरद बोबडे सर्वोच्च न्यायालयाचे नवे सरन्यायाधीश, 18 नोव्हेंबरला पदभार स्वीकारणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2019 10:40 AM