प्रयागराज : अलाहाबाद उच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायाधीश सुधीर अग्रवाल यांनी सर्वाधिक जास्त खटले निकालात काढून इतिहास रचला आहे. विशेष म्हणजे, न्यायाधीश सुधीर अग्रवाल हे भारतातच नाही, तर आशियात सर्वाधिक जास्त खटले निकालात काढणारे न्यायाधीश ठरले आहेत.
न्यायाधीश सुधीर अग्रवाल यांनी 31 ऑक्टोबरपर्यंत 30 हजार 418 खटले निकालात काढले आहेत. गेल्या वर्षीही न्यायाधीश सुधीर अग्रवाल यांनी 1 लाख 12 हजार खटले निकालात काढून इतिहास रचला होता. त्यावेळी ते देशात सर्वाधिक जास्त खटले निकालात काढणारे न्यायाधीश ठरले होते. तसेच, अयोध्या विवाद प्रकरणावर निर्णय देणाऱ्या अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या खंडपीठामध्येही त्यांचा समावेश होता.
न्यायाधीश सुधीर अग्रवाल यांची 5 ऑक्टोबर 2005 रोजी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली. तेव्हापासून त्यांनी आपल्याकडे असलेल्या प्रत्येक खटल्याचे कामकाज जलदगतीने पूर्ण होईल,असा कटाक्ष बाळगला आहे. 23 एप्रिल 2020 पर्यंत ते न्यायाधीश म्हणून काम पाहणार आहेत. 24 एप्रिल 1958 रोजी शिकोहाबादमध्ये जन्मलेले न्यायाधीश सुधीर अग्रवाल स्वतःच्या निर्भिड आणि कठोर निर्णयांसाठी ओळखले जातात.