"भारतात राहणाऱ्या बहुसंख्य लोकांनुसारच देश चालणार"; न्यायमूर्ती शेखर यादव वक्तव्यावर ठाम, सरन्यायाधीशांना पाठवले उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 09:53 IST2025-01-17T09:52:48+5:302025-01-17T09:53:12+5:30
अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शेखर यादव विश्व हिंदू परिषदेच्या कार्यक्रमात केलेल्या त्यांच्या वक्तव्यावर अद्याप ठाम आहेत.

"भारतात राहणाऱ्या बहुसंख्य लोकांनुसारच देश चालणार"; न्यायमूर्ती शेखर यादव वक्तव्यावर ठाम, सरन्यायाधीशांना पाठवले उत्तर
Justice Shekhar Kumar Yadav: अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शेखर यादव विश्व हिंदू परिषदेच्या कार्यक्रमात केलेल्या त्यांच्या वक्तव्यावर अद्याप ठाम आहेत. या कार्यक्रमात न्यायमूर्ती शेखर यादव यांनी मुस्लीम समालाजा लक्ष्य करून टीका केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.न्यायमूर्ती यादव यांच्या विधानानंतर वाद वाढल्याने हे प्रकरण सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचलं होतं. यावर सुप्रीम कोर्टाने त्यांना समन्स बजावून न्यायमूर्ती यादव यांनी अशी विधाने टाळावीत, असे म्हटले होते. मात्र सरन्यायाधिशांना पत्र लिहून न्यायमूर्ती यादव यांनी आपण आपल्या विधानावर ठाम राहणार असल्याचे सांगितले आहे.
विश्व हिंदू परिषदेच्या कार्यक्रदरम्यान, न्यायमूर्ती शेखर यादव यांनी केलेल्या विधानांवरुन वादंग निर्माण झाला होता. सुप्रीम कोर्टाच्या कॉलेजियमने न्यायमूर्ती शेखर कुमार यादव यांना मुस्लिमांवर निशाणा साधलेल्या एका वक्तव्यावरून समन्स बजावले होते. अलाहाबाद हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश अरुण भन्साळी यांनी १७ डिसेंबर रोजी सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्या नेतृत्वाखालील कॉलेजियमसोबतच्या बैठकीनंतर न्यायमूर्ती यादव यांच्याकडे या विषयावर स्पष्टीकरण मागितले होते. त्या नोटिशीच्या जवळपास महिनाभरानंतर न्यायाधीश कुमार यादव यांनी पत्र लिहून आपण आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचे म्हटलं आहे.
जानेवारीच्या सुरुवातीला सरन्यायाधीशांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश भन्साळी यांना पत्र लिहून या प्रकरणाचा नवीन अहवाल मागवला होता.
न्यायमूर्ती यादव यांनी न्यायाधीश अरुण भन्साळी यांना पत्र लिहून आपण आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचे म्हटले आहे. आपल्या वक्तव्याने न्यायालयीन आचारसंहितेचे कोणतेही उल्लंघन झाले नसल्याचे न्यायमूर्ती शेखर यादव यांनी स्पष्ट केले.मुख्य न्यायाधीश अरुण भन्साळी यांनी आपल्या पत्रात कायद्याच्या विद्यार्थ्याचा आणि एका निवृत्त आयपीएस अधिकाऱ्याच्या तक्रारीचा उल्लेख केला होता.
स्पष्टीकरण देताना," काही लोकांनी आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी आपल्या भाषणाचा विपर्यास केल्याचा दावा न्यायमूर्ती यादव यांनी आपल्या उत्तरात केला आहे. माझ्यासारखे न्यायपालिकेचे सदस्य सार्वजनिक ठिकाणी स्वतःचा बचाव करू शकत नाहीत. त्यामुळे मला न्यायव्यवस्थेतील वरिष्ठांकडून संरक्षण मिळायला हवे," असं न्यायमूर्ती शेखर यादव म्हणाले. त्यामुळे आता आपल्या वक्तव्याबद्दल न्यायमूर्ती यादव यांनी माफी मागितली नसल्याचे म्हटलं जात आहे.
८ डिसेंबर रोजी अलाहाबाद हायकोर्ट बार असोसिएशनच्या लायब्ररीत आयोजित विश्व हिंदू परिषदेच्या कार्यक्रमात बोलताना न्यायमूर्ती यादव यांनी समान नागरी संहिता हिंदू विरुद्ध हिंदू असा मुद्दा मांडला होता. “हा हिंदुस्तान आहे असे म्हणण्यात अजिबात संकोच नाही. हिंदु्स्तान बहुसंख्य लोकांच्या इच्छेनुसारच चालेल. कायदा हा बहुमताने चालतो," असं विधान न्यायमूर्ती यादव यांनी केले होते.