मयूर पठाडे / ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 10 - वयाच्या बाराव्या वर्षीच सुपरस्टार बनलेल्या कॅनडियन पॉप सिंगर जस्टीन बीबरची केवळ एक झलक पाहण्यासाठी आज केवळ मुंबईकरच नाही तर संपूर्ण देशभरातील म्युझिक चाहते उत्सुक आहेत. मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर होत असलेल्या या कार्यक्रमासाठी तरुण- तरुणी अक्षरश: क्रेझी झालेले आहेत. पण आत्ता या घडीला तरी तो ‘शेरा’च्या ताब्यात आहे! त्याच्या तावडीतून सुटका झाली, तरच चाहत्यांना जस्टीन बेबरची झलक पाहता येईल, त्याला जवळून पाहाता येईल, त्याची भेट घेता येईल किंवा नशीब खूप म्हणजे खूपच जोरावर असलं तरच त्याची सहीदेखील घेता येईल.
आज वयाच्या 23 व्या वर्षीच कोट्यवधी डॉलर्सची कमाई करणारा जस्टीन बीबर फोर्बसच्या यादीतलाही ‘थर्टी अंडर थर्टी’ कॅटॅगिरीतला मोस्ट फेवरिट सेलिब्रिटी आहे. केवळ आपल्या गाण्यांच्या जोरावर तो किती कमाई करीत असेल? भारतीय रुपयांत सांगायचं तर गेल्या वर्षीची त्याची कमाई होती, 362 कोटी रुपये! 30 वर्षांच्या आतल्या सर्वाधिक कमाई करणार्या सेलिब्रिटींमध्ये जगात त्याचा सहावा क्रमांक लागतो.
जस्टीन बीबरची केवळ एक झलक पाहण्यासाठी वेड्या झालेल्या तरुण-तरुणींच्या गराड्यापासून वाचवण्यासाठी जस्टिनभोवतीची सुरक्षाही मोठी कडक करण्यात आली आहे.
आपल्या सुरक्षेसाठी जस्टीन बीबरनं स्वत:चे बॉडीगार्ड तर सोबत आणले आहेतच, पण त्याच्या खास सुरक्षेची जबाबदारी कोणावर सोपवली आहे माहीत आहे? ‘शेरा’ हा सलमानखानचा गेल्या वीस वर्षांपासूनचा खास बॉडीगार्ड आहे. जस्टीन बीबरच्या सुरक्षेची जबाबदारीही त्याच्यावरच सोपवण्यात आली आहे.
सलमानच्या चाहत्यांसाठी ही आणखीच खुशीची बात आहे. मात्र जस्टीन बीबरचे नखरे सांभाळण्याची फार मोठी कसरत त्याच्या आजूबाजूला असणार्यांना करावी लागणार आहे. केवळ आपल्या गाण्यांमुळेच नाही, तर त्याच्या चित्रविचित्र गोष्टींमुळेही तो कायम चर्चेत असतो. त्यामुळे अनेकदा त्यानं वाद ओढवून घेतले आहेत. आताही मुंबईतल्या कार्यक्रमासाठी त्यानं ज्या मागण्या केल्या होत्या, त्यानं अनेकांवर तोंडात बोटं घालायची वेळ आली.
जस्टीन बीबरच्या मागण्या आणि शाही थाट
1- स्टेडियमवर उतरण्यासाठी खास हेलिकॉप्टर
2- 24 तास झेड प्लस सिक्युरिटी
3- राहाण्यासाठी फाईव्ह स्टार दोन हॉटेल्स
4- जस्टीन बीबरसाठी दोन रोल्स राईस कार्स
5- त्याच्याबरोबरच्या मेंबर्ससाठी दहा सेदान कार्स आणि दोन वोल्वो बस
-अशा अनेक गोष्टी.
जस्टीन बीबरसाठी पागल झालेल्या लोकांना आणि जस्टीन बीबरलाही खूश करायचं तर आयोजकांपुढे दुसरा पर्याय तरी काय आहे?