भोपाळ : ज्योतिरादित्य शिंदे यांना 24 कॅरेटचे गद्दार असल्याचे सांगत पक्षात अशा नेत्यांच्या परतीला वाव नाही, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी निशाणा साधला आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी मार्च 2020 मध्ये काँग्रेस पक्षला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला. ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेस सोडल्यानंतर त्यांच्यासोबत असलेल्या 22 आमदारांनीही काँग्रेसचा राजीनामा दिला होता. त्यामुळे मध्य प्रदेशातील काँग्रेसचे सरकार कोसळले होते.
ज्योतिरादित्य शिंदे गद्दार आहेत, खरे गद्दार आणि 24 कॅरेटचे गद्दार आहेत. तर कपिल सिब्बल सारख्या लोकांना, ज्यांनी पक्ष सोडल्यानंतर मौन पाळले आहे, त्यांना कॉंग्रेसमध्ये परत येऊ दिले जाऊ शकते, परंतु ज्योतिरादित्य शिंदे किंवा हिमंत विश्व शर्मा सारख्या लोकांना नाही, असे जयराम रमेश म्हणाले. तसेच पक्षांतर करणाऱ्याला काँग्रेसमध्ये परतायचे असेल तर पक्षाची भूमिका काय असेल, असा सवाल केल्यानंतर जयराम रमेश म्हणाले की, काँग्रेस सोडलेल्यांना परतण्याची संधी देऊ नये, असे मला वाटते. पक्षाला शिवीगाळ करून सोडून गेलेले काही लोक आहेत, त्यामुळे त्यांना परत घेऊ नये. पण, असे काही लोक आहेत ज्यांनी पक्षापासून फारकत घेतली आहे आणि काँग्रेस आणि त्यांच्या नेतृत्वाविषयी सन्माननीय मौन पाळले आहे.
दरम्यान, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने जयराम रमेश पत्रकारांशी बोलत होते. ही पदयात्रा शुक्रवारी मध्य प्रदेशातील आगर मालव्यात दाखल झाली. ते म्हणाले की मी माझे माजी सहकारी आणि खूप चांगले मित्र कपिल सिब्बल यांचा विचार करू शकतो, ज्यांनी काही कारणास्तव पक्ष सोडला, परंतु ज्योतिरादित्य शिदें आणि हेमंत विश्व शर्मा यांच्या विपरीत, त्यांनी काँग्रेस पक्षाबद्दल अत्यंत सन्माननीय मौन पाळले आहे. त्यामुळे ज्या नेत्यांनी प्रतिष्ठा राखली आहे, त्यांना परत येऊ दिले जाऊ शकते असे मला वाटते, पण ज्यांनी पक्ष सोडला आणि पक्षाच्या नेतृत्वाविरोधात वक्तव्ये केली, त्यांना परतण्याची संधी मिळणार नाही, असे जयराम रमेश म्हणाले. याचबरोबर, यावेळी शिंदे यांना पक्षाचे अध्यक्ष, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री किंवा राज्यसभा सदस्यपदाची ऑफर दिली असती तर ते वेगळे झाले असते का? असा सवाल करण्यात आला. यावर जयराम रमेश म्हणाले, शिंदे गद्दार आहेत, खरे गद्दार आणि 24 कॅरेटचे गद्दार आहेत.
ज्योतिरादित्य शिंदे हे 24-कॅरेट देशभक्त - रजनीश अग्रवालदुसरीकडे, जयराम रमेश यांच्या टिप्पणीवर प्रतिक्रिया देताना, भाजपचे मध्य प्रदेश युनिट सचिव रजनीश अग्रवाल म्हणाले की, "ज्योतिरादित्य शिंदे हे 24-कॅरेट देशभक्त आहेत, ज्यांची सांस्कृतिक मुळे मजबूत आहेत. ज्योतिरादित्य शिंदे आणि शर्मा दोघांचीही कामासाठी 24 कॅरेटची प्रतिबद्धता आहे आणि जयराम रमेश यांच्या टिप्पण्या अत्यंत असभ्य आणि पूर्णपणे अलोकतांत्रिक आहेत."