राहुल गांधींसमोरच ज्योतिरादित्य शिंदे आणि दिग्विजय सिंह यांच्यात खडाजंगी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2018 02:00 PM2018-11-01T14:00:27+5:302018-11-01T14:14:16+5:30

पंधरा वर्षापासून मध्य प्रदेशमध्ये सत्तेबाहेर असलेल्या काँग्रेसने यावेळी विजय मिळवण्यासाठी कंबर कसली आहे. मात्र काँग्रेसच्या सत्तेतील पुनरागमनामध्ये त्यांच्याच नेत्यांमधील बेदिली हा मोठा अडथळा ठरण्याची शक्यता आहे.

Jyotiraditya Scindia and Digvijay Singh clash News | राहुल गांधींसमोरच ज्योतिरादित्य शिंदे आणि दिग्विजय सिंह यांच्यात खडाजंगी

राहुल गांधींसमोरच ज्योतिरादित्य शिंदे आणि दिग्विजय सिंह यांच्यात खडाजंगी

googlenewsNext

भोपाळ - पंधरा वर्षापासून मध्य प्रदेशमध्ये सत्तेबाहेर असलेल्या काँग्रेसने यावेळी विजय मिळवण्यासाठी कंबर कसली आहे. मात्र काँग्रेसच्या सत्तेतील पुनरागमनामध्ये त्यांच्याच नेत्यांमधील बेदिली हा मोठा अडथळा ठरण्याची शक्यता आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची निवड पक्षासाठी डोकेदुखी ठरत असून, उमेदवारांच्या निवडीसाठी बुधवारी रात्री झालेल्या बैठकीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासमोरच पक्षाचे मध्य प्रदेशमधील दिग्गज नेते दिग्विजय सिंह आणि ज्योतिरादित्य शिंदे यांच्यात खडाजंगी उडाली.

बुधवारी रात्री मध्य प्रदेशमधील उमेदवारांच्या यादीला अंतिम रूप देण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पक्षाच्या केंद्रीय निवड बैठक बोलावली होती. या बैठकीला काँग्रेसचे मध्य प्रदेशमधील अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. मात्र ही बैठक दिग्विजय सिंह आणि ज्योतिरादित्य शिंदे यांच्यातील खडाजंगीमुळेच गाजली. आपापल्या गटातील उमेदवारांना तिकीट मिळवून देण्यावरून दिग्विजय आणि शिंदे यांच्यात वाद झाला. सुरुवातीला चर्चेच्या माध्यमातून सुरू झालेल्या वादाने पुढे खडाजंगीचे रूप घेतले. हा प्रकार सुरू असताना तिथे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीसुद्धा उपस्थित होते. 

 शेवटी हा वाद निस्तरण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना एक त्रिसदस्यीय समिती नेमावी लागली. अशोक गहलोत, वीरप्पा मोईली आणि अहमद पटेल यांचा समावेश असलेल्या या समितीने रात्री उशिरा बैठक घेऊन वाद सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र या वादावर समाधानकारक तोडगा निघालेला नाही. सध्यातरी या वादावर कोणतेही भाष्य करण्यास पक्षाकडून सर्व नेत्यांना मनाई करण्यात आली आहे. 

दरम्यान, मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी नामांकन प्रक्रिया शुक्रवारपासून सुरू होणार आहे.  नामांकन दाखल करण्याची शेवटची तारीख 9 नोव्हेंबर असेल. काँग्रेस आणि भाजपाकडून 5 नोव्हेंबरपर्यंत आपल्या सर्व उमेदवारांची नावे जाहीर होण्याची शक्यता आहे. तसेच दोन्ही पक्षांची पहिली उमेदवार यादी प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. 
 

Web Title: Jyotiraditya Scindia and Digvijay Singh clash News

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.